पोहरादेवी यात्रा : ७ ते ११ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

0
16

वाशिम दि.०६ एप्रिल (प्रतिनिधी)

देशातील असंख्य बंजारा समाज बांधवांचे पोहरादेवी हे मुख्य श्रद्धास्थान आहे. जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील मानोरा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पोहरादेवी येथे ७ ते ११ एप्रिल दरम्यान पोहरादेवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. येथील माता जगदंबा देवीच्या मंदिरासमोर पूर्वीच्या बंजारा समाजाच्या प्रथेनुसार भाविक आपला नवस फेडण्याकरीता बोकड बळी देतात.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जगदंबा देवीच्या मंदिरासमोर बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली आहे.जगदंबा देवीच्या यात्रेमध्ये बोकड बळी प्रथेवरील बंदीमुळे यात्रेस येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र रोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोहरादेवीच्या यात्रेत राज्यातून तसेच आंध्रप्रदेश,तेलंगणा,कर्नाटक गुजरात व राजस्थान या राज्यातून दोन ते अडीच लाख बंजारा समाजाचे भाविक येतात.यात्रेमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येणे-जाणे करून आपला नवस फेडण्याकरीता मंदिराच्या दूर अंतरावर जाऊन बोकडबळी देऊन आपला नवस फेडतात.

पोहरादेवी येथील जगदंबा देवीचे मुख्य मंडपाचे सभामंडप व त्यालगतच्या २०० मिटर परिसरात बोकड बळीस निर्बंध घालण्याच्या अनुषंगाने निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याकरीता जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी ७ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश केले आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here