यवतमाळ दिनांक 11 एप्रिल ( प्रतिनीधी)
जिल्हा परिषदेच्या आवारात आकारास येत असलेल्या महिला व बालविकास भवनाच्या बांधकामाची आज जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी भेट देवून पाहणी केली.
या इमारतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ,बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी आणि ग्रामीण), जिल्हा बाल संरक्षण कक्ष, संरक्षण अधिकारी, तालुका संरक्षण अधिकारी ही सर्व कार्यालये एकाच छताखाली एकत्रित येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना त्यांच्या सर्व अडचणी एकाच ठीकाणी सोडविणे सोयीचे होणार आहे.
महिला व बाल विकास विभागाची सर्व कार्यालये येथे स्थलांतरीत होण्याचे दृष्टीने इमारतीचे बांधकाम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिल्या.
सध्या या इमारतीचे बांधकाम 40 टक्के पूर्ण झाले आहे. ‘आजादी का अमृत महोत्सव’ व ‘नारी शक्ती’ या दोन संकल्पनेवर आधारित सुंदर शिल्प इमारतीच्य दर्शनी भागात लावण्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप कुटे, ठाकरे, प्रविण येंडे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.






