प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना : पुढील वर्षासाठी 22 कोटी 41 लाखाचा आराखडा मंजूर

0
8

वर्धा, दि.21 मार्च (प्रतिनिधी) :

 5 हजार 300 हेक्टरवर जलसंधारणाची कामे

 जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषि सिंचनचा आढावा

केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली जात आहे. सन 2022-23 या वर्षासाठी योजनेंतर्गत 22 कोटी 41 लक्ष रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून 5 हजार 300 हेक्टरवर जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

बैठकीला जिल्हाधिका-यांसह जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तालुकास्तरीय अधिकारी ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते.

कृषि सिंचन योजनेंतर्गत जलसंधारणाची वेगवेगळी कामे हाती घेतली जातात. त्यात निवड झालेल्या गावांमध्ये योजने अंतर्गत ढाळीचे बांध, सिमेंटनाला बांध, खोल सलग समतल चर आदी जलसंधारणाची कामे केली जातात. या कामांसोबतच प्रकल्पामध्ये समाविष्ठ असलेल्या गावातील भूमिहीन नागरिक, बचतगट, वैयक्तिक शेतकऱ्यांना विविध प्रकरच्या व्यवसायासाठी फिरता निधी सुध्दा दिल्या जातो.

सन 2022-23 या वर्षासाठी कृषि विभागाने तयार केलेला वार्षिक कृती आराखडा 22 कोटी 41 लक्ष रुपयांचा आहे. या आराखड्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये 5 हजार 300 हेक्टर इतके क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणल्या जाणार आहे. या क्षेत्रावर विविध जलसंधारणाची कामे केली जातील.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची योजना आहे. या योजनेतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जलसंधारणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. जास्तीत जास्त गावे या योजनेत समाविष्ठ करण्यासोबतच योजनेतून मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बैठकीत संबंधितांना दिले.

यापुर्वी चार प्रकल्पांना मंजुरी

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत सन 2021-22 या वर्षात जिल्हयात 26 कोटी 34 लक्ष किंमतीच्या चार प्रकल्पांना यापुर्वीच मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमधील एकुण 43 गावांमध्ये तब्बल 13 हजार हेक्टरवर जलसंधारणाची कामे केली जात आहे.

000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here