कोरोना काळातील व्यवसाय कराच्या विवरणपत्रावरील विलंब शुल्क माफ

0
8

वर्धा, दि.21 मार्च (प्रतिनिधी) :

गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे अनेक क्षेत्रांत व्यावसायिकांचे नुकसान झाले. हे लक्षात घेऊन शासनाने व्यवसाय कराच्या विवरणपत्रावरील विलंब शुल्क माफ करुन व्यापा-यांना मोठा दिलासा दिलेला आहे. या संधीचा जास्तीत जास्त व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवसाय कर अधिकारी प्रशांत मुंद्रे यांनी केले आहे.

व्यवसाय कर कायदा 1975 अन्वये भरावे लागणारे मासिक आणि वार्षिक विवरणपत्रावरील विलंब शुल्क शासनाने 25 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी करुन माफ केले आहे. विवरणपत्र हे नियमित कालावधीमध्ये भरणे आवश्यक असते अन्यथा 30 दिवसापर्यंतच्या विलंबासाठी 200 रुपये व त्यानंतरच्या प्रत्येक विलंबासाठी 1 हजार रुपये इतके विलंब शुल्क आकारले जाते, परंतु अनेक व्यावसायीक कोरोनाच्या संकटामुळे विवरणपत्र भरणा करु शकले नाही. अशा व्यवसायिकांना शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे.

डिसेंबर 2021 पर्यंतच्या कोणत्याही कालावधीचा देय व्यवसाय कर व व्याजाचा भरणा करुन विवरणपत्रके 31 मार्च 2022 पर्यंत दाखल केल्यास विलंब शुल्क माफी लागू राहील. त्यामुळे सर्व आस्थापना, व्यापारी, व्यावसायिकांनी या संधीचा लाभ घेऊन प्रलंबित विवरणपत्र लवकरात लवकर दाखल करावीत, असे व्यवसाय कर अधिकारी, वस्तू व सेवा कर कार्यालय यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here