गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातील पोलिसांनी राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानाला मोठं यश आलं आहे. पोलीस कारवाईत पाच नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगल परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकही झाली.पोलिसांच्या नक्षलविरोधी सी-६० पथकाने ३ दिवसापासून राबवलेल्या अभियानात ५ नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी झाली आहे. ३ पुरुष २ महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक(अभियान) मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात हे अभियान राबवले गेले होते. या कारवाईनंतर गडचिरोली मुख्यालयात मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य-बंदुका- स्फोटके आणि दैनंदीन साहित्य ताब्यात आल्याची माहिती देण्यात आली.
काडतुसे, मॅगझीन, ३ प्रेशर बॉम्ब, सुतळी बॉम्ब, सोलर प्लेट, औषध साठा, वायर बंडल आदीचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगल परिसरात गस्त घालण्यासाठी गेलेल्या सी-६० कमांडोच्या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. सध्या तेथील गोळीबार थांबला आहे, असं गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले. नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी आता शोध मोहीम राबवली जात आहे.५ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कोरपर्सी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली होती. सुमारे १२ तास चाललेल्या चकमकीत सी-६० चा एक जवान शहीद झाला होता. चकमकीदरम्यान काही सैनिकही जखमी झाले. तेथे काही सैनिक अडकलेही होते. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली होती.





