वाशिम दि.१० एप्रिल (प्रतिनिधी)
देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे रामनवमीनिमित्त आज १० एप्रिल रोजी मोठी उत्सव यात्रा भरली. या यात्रेमध्ये राज्यातून,तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून असंख्य भाविक आल्याने पोहरादेवी नगरी श्रद्धेने दुमदुमली.
पोहरादेवी येथे भाविकांनी माता जगदंबा देवी,संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज,संत रामराव महाराज समाधीस्थळी,भक्तीधाम येथे आणि धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांचे दर्शन घेतले.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार,माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड,आमदार अमित झनक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील दर्शन घेतले.
कोरोना संसर्गामुळे ही यात्रा मागील दोन वर्षापासून भरली नव्हती. यावर्षी असंख्य भाविकांनी या पवित्र तिर्थस्थळी दर्शन घेतले.माता जगदंबा देवी,संत सेवालाल महाराज मंदिर, संत रामराव बापू समाधीस्थळी भाविकांनी गर्दी केली होती.





