वर्धा भाजपा जिल्हाअध्यक्ष शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
11

वर्धा दिनांक 15 नोव्हेंबर प्रतिनिधी

वर्धा जिल्हा अध्यक्ष डॉ.शिरीष गोडे यांनी राजीनामा देत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा देत असल्याचे पत्र पाठवले होते. अखेर आज त्यांनी राजीनामा दिला.

त्यावेळी पाटील यांनी खासदार रामदास तडस यांच्या मार्फत गोडेंची समजूत काढली होती. मात्र भाजपमध्ये घुसमट होत असल्याची भावना ते व्यक्त करतच होते. एका कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच के पटेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,पालकमंत्री सुनील केदार, ज्येष्ठ नेत्या चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या उपस्थितीत डॉ.गोडे यांनी काँग्रेस प्रवेश केला.

दोन वर्षांपासून ते अध्यक्ष होते. त्या पूर्वी २०१४ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. काँग्रेसचे खासदार राहिलेल्या संतोषराव गोडे यांचे चिरंजीव असलेल्या डॉ गोडे यांनी आरोग्य खात्यात वरिष्ठ पद भूषवून राजीनामा देत काँग्रेसचे राजकारण सुरू केले होते. मात्र संधी न मिळाल्याने त्यांनी बसपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.

पुढे भाजपामध्ये प्रवेश केल्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी खेडोपाडी भाजपा मजबूत करण्याचे कार्य केले. संघनिष्ठ भाजपा नेतेही पक्ष चालवावा तो गोडेनीच, अशी प्रशस्ती देत. त्यांच्या निर्णयास एकही नेता विरोध करीत नसे. असा लोकप्रिय नेता पक्ष सोडून गेल्याबद्दल काहींनी खंत व्यक्त केली. तर पटोले म्हणाले की, गोडे यांचा सर्व तो सन्मान राखून त्यांना जबाबदारी दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here