शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

0
19

वर्धा दिनांक 28 जून (प्रतिनिधी) :

 5 ते 20 जुलै दरम्यान विशेष मोहिम

 सर्वेक्षणासाठी गाव स्तरावर पथके

 जिल्हाधिकाऱ्यांकडून मोहिमेचा आढावा

ग्रामीण भागातील विशेषतः गरीब कुटुंबातील काही मुले विविध कारणास्तव अद्यापही शिक्षणाच्या मुळ प्रवाहातून बाजूला असल्याचे दिसून येते. अशा प्रत्येक बालकास शाळेत दाखल करुन त्यांना शिक्षण हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेतला.

बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओम्बासे, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, प्राथमिक शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवने, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ, महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल मेसरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.मंगेश घोगरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर आदी उपस्थित होते.

विविध कारनास्तव मुले शाळाबाह्य होतात. काही मुले शाळेत अनियमित असतात. कुंटूंबाचे स्थलांतरण झाल्यानंतर देखील मुले शाळाबाह्य होतात अशा सर्व बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन घेण्यासाठी ही विशेष मोहिम दि.5 ते 20 जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. मोहिमे अंतर्गत शाळाबाह्य असलेले 3 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल केले जातील.

मोहिम कालावधीत शिक्षण, महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय विभाग, महिला बाल विकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विभाग आणि आरोग्य व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने शाळाबाह्य बालकांचा शोध घेतल्या जातील.

यासाठी जिल्हा, तालुका व गाव स्तरावर सर्वेक्षण पथके नेमण्यात येणार आहे. ही पथके घरोघरी जाऊन बालकांची माहिती घेतील. त्यात कुंटूंबाच्या सर्वसाधारण माहितीसह शाळाबाह्य बालके तसेच स्थलांतरीत होऊन आलेली व स्थलांतरीत होऊन गेलेल्या बालकांचा समावेश असेल.

गाव स्तरीय पथके बसस्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्टया, दगडखानी, साखर व इतर कारखाने या ठिकाणी तसेच खेडी, गावे, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे याशिवाय इतर ठिकाणी वास्तव्य करणा-या कुंटूंबाचा देखील सर्वे करुन शाळाबाह्य मुलांचा शोध घेतील.

यासाठी प्रशासनाच्यावतीने जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. मोहिमे दरम्यान रोजच्या सर्वेक्षणाचा अहवाल शिक्षण विभागास सादर करावा लागतील. या दरम्यान आढळणा-या बालकांना नजीकच्या शाळेत दाखल केले जातील.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here