वाशिम दिनांक 3 जून (प्रतिनिधी) :
कारंजा शहरातील नझूल शिट क्रमांक 9 प्लॉट क्रमांक 2 क्षेत्र 67 हजार 795.58 चौ.मी. ही जागा अमृतलाल थद्दानी व इतरांनी त्यांचे नावे नियमाकुल केली असल्याबाबत अपर जिल्हाधिकारी वाशिम यांचा हा आदेश पारीत 2 मार्च 2011 कार्यालयातील आवक रजिस्टरमध्ये दाखल केला.
या आदेशासोबत अमृतलाल थद्दानी व माया वसंतवाणी यांनी आदेशाचा अंमल घेण्याबाबत विनंती अर्ज व प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे जाऊन सदर आदेशाची प्रमाणित प्रत कारंजा येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात दाखल केल्यामुळे सदर आदेशाचा दिनांक 12 मे 2022 रोजी अंमल घेवून रितसरपणे फेरफार रुजू करण्यात आला.
परंतू या आदेशाबाबत उपअधिक्षक भूमी अभिलेखच्या कारंजा कार्यालयाला संशय निर्माण झाल्यामुळे कारंजा येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक संभाजी मोतीबोने यांनी स्वत: 23 मे 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे जाऊन आदेशाची शहानिशा केली असता सदर आदेश जिल्हाधिकारी, वाशिम यांचे कार्यालयाचा नसल्याने तहसिलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांनी लेखी दिले.
आदेशानुसार घेतलेला फेरफार 27 मे 2022 रोजी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेऊन नियमानुसार रद्द करण्यात आल्याची माहिती कारंजा येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक संभाजी मोतीबोने यांनी दिली.





