वर्धा दिनांक 6 मे (प्रतिनिधी) :
केंद्रीय ग्रामविकास विभागाची अंत्योदय मोहिम
देशातील केवळ 75 जिल्ह्यांचा अभियानात समावेश
90 दिवसाची मोहिम, 23 प्रकारच्या सुविधांचा लाभ
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय ग्रामविकास विभागाच्यावतीने देशातील 75 जिल्ह्यांमध्ये अंत्योदय अभियान राबविण्यात येत आहे. अभियानासाठी केंद्र शासनाच्यावतीने राज्यातील तीन जिल्हे निवडण्यात आले असून त्यात वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. नव्वद दिवस चालणाऱ्या या अभियानात संबंधित विभागांनी उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केल्या आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत आहे. त्यानिमित्त केंद्रीय ग्रामविकास विकास राज्य व केंद्र शासित प्रदेशातील 75 जिल्ह्यांमध्ये सदर अभियान 90 दिवस राबवित आहे. या अभियानाचा शुभारंभ केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह यांच्याहस्ते नुकताच झाला. अभियानांतर्गत निवड केलेल्या जिल्ह्यांमध्ये नऊ विभागांना त्यांच्या योजनांची जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट अंमलबजावणी करावयाची आहे. सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांना केंद्र शासनाच्यावतीने गौरविण्यात येणार आहे.
अभियान काळात दिव्यांग बांधवांचा डाटा डिजीटलाईज करून अधिकाधिक दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांना अतिरिक्त सकस आहार पुरविण्यासोबतच उत्कृष्ट औषधोपचार उपलब्ध करून देतील. सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ दिला जातील. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेत पात्र लाभार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये कौशल्य विकासाच्या कामाला गती द्यावयाची आहे. प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देण्यासोबतच पात्र शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेतले जातील तसेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. हर घर दस्तक या योजनेंतर्गत प्रत्येकाचे कोरोना लसिकरण पुर्ण करण्यासाठी 75 जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
जनावरांना विविध आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अभियान काळात जनावरांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येतील. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटीत कामगारांची नोंदणी प्राधान्याने केली जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात येतील अशा 23 प्रकारच्या सेवा लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांन अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी केले आहे.
देशातील 75 जिल्ह्यांमध्ये वर्धा जिल्ह्याच्या समावेश असणे ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे. अभियानातील उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्ह्यांचा गौरव देखील केला जाणार आहे. त्यामुळे नव्वद दिवसांच्या अभियान काळात नवही विभागांनी उत्कृष्ट कामगिरी करावी. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या काळात लाभ मिळवून द्यावा. विविध योजनांमध्ये त्यांना सामावून घेण्यात यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सर्व संबंधित विभागांना केल्या आहे.






