नागपूर/अमरावती
कोविड ची भयावह लाट थोपवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती शहराला मदत केली आहे. शहराला 20 व्हेंटिलेटर्स आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात पाच कोटी रुपये खर्चून 200 क्युबिक मीटरचा ऑक्सिजन प्लांट दिला आहे. डॉ. सुनील देशमुख यांच्या विनंतीला मान देत नितीन गडकरी यांनी ही मदत केली आहे.
कोविडची लाट थोपवण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा, रेमडीसीवीर, व्हेंटिलेर्टर्स, रुग्णवाहिका आणि आवश्यक त्या सामग्रीचा पुरवठा करण्याचा सपाटा नितीन गडकरी यांनी लावला आहे. अमरावतीला देखील ठोस मदत द्यावी, अशी विनंती डॉ. सुनील देशमुख यांनी नितीन गडकरी यांना केली होती. त्यानुसार आज नितीन गडकरी यांनी मदतीच्या पहिल्या टप्प्यात अमरावतीला भरीव मदतीचा हात दिला. आज नागपूर येथे डॉ. सुनील देशमुख यांच्यासह शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन उपाख्य भय्यासाहेब देशमुख, भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि डॉ. अनिल देशमुख यांच्याकडे अमरावती शहरासाठी 20 व्हेंटिलेटर्स सुपूर्द केले. यातील दहा व्हेंटिलेटर्स डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला तर दहा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला देण्यात आले.
आगामी काळात ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला 200 क्युबिक मीटरचा ऑक्सिजन प्लांट सीएसआर फंडातून उभारण्याचे नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले आहे. आगामी आठवड्यात हा प्लांट उभारणीला प्रारंभ होणार आहे. या प्लांट मुळे अमरावती शहराला व जिल्ह्याला देखील ऑक्सिजन पुरवता येणार आहे. या शिवाय अमरावती शहराला आणखी मदत करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.






