मातोश्री ग्राम समृद्धी योजनेत जिल्ह्यातील 539 पाणंद रस्त्याच्या आराखड्यास मंजुरी

0
12

यवतमाळ, दि 5 एप्रिल (प्रतिनिधी):-

ग्रामीण भागातील शेत, पाणंद रस्ते प्रमाणित दर्जाचे आणि पक्के रस्ते होण्यासाठी राज्य शासनाने मातोश्री ग्राम ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाच्या आराखड्यास शासन स्तरावरून मान्यता देण्याची तरतूद करण्यात आली असून यवतमाळ जिल्ह्यातील 539 पाणंद रस्त्यांच्या 638 किलोमीटरच्या कामाच्या आराखड्यास 3 मार्च रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

सन 2022- 23 या आर्थिक वर्षात सदर कामे पूर्ण करायची आहेत. रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून कामांना मंजुरी मिळेल यासाठी सतत जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांना निर्देशित करून पाठपुरावा केला आहे.

शेत, पाणंद रस्ते हे प्रमुख्याने शेतीमधील कामाकरिता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने आण करण्याकरिता उपयोगात येतात यांत्रिकीकरणामुळे शेती मध्ये पेरणी आंतरमशागत कापणी मळणी व इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. या यंत्रसामुग्रीची वाहतूक करण्याकरिता बारमाही वापराकरिता शेत पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे आहे.

त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणीत दर्जाचे शेत पाणंद रस्ते तयार करण्याकरिता मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली. सदर योजना मग्रारोहयो आणि राज्य रोहयो मधून राबविण्यात येणार आहे. 11 नोव्हेम्बर 2021 रोजी यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या.

पाणंद रस्ते महामार्ग रस्त्याएव्हढेच महत्वाचे आहेत. त्यामुळे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्ते होण्यासाठी ग्रामीण रस्त्यासाठीचे मापदंड याला लागु राहतील. रस्त्यांची कामे पावसाळ्यात करणे अडचणीचे ठरत असल्याची बाब विचारात घेऊन जास्तीत जास्त कामे उन्हाळ्याच्या कालावधीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील 539 रस्त्याच्या कामांच्या आराखड्यास शासनाने मान्यता दिली आहे. ज्या ग्रामपंचायतींनी यासाठी तयारी दर्शविली आहे त्या ग्रामपंचायतींच्या कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 539 कामांचा समावेश आहे. : पुसद- 38, महागाव -38, केळापूर- 19, घाटंजी -16, आर्णी – 21, उमरखेड 120, झरी जामणी – 16, यवतमाळ 48, वणी 35, दिग्रस 31, दारव्हा 41, बाभूळगाव 27, राळेगाव 20, नेर 31, कळंब 8, मारेगाव- 30 अशी 539 कामे मंजूर करण्यात आली असून यातून 638 किलोमीटरचे पाणंद रस्ते तयार होतील.

शासन निर्णयानुसार आणि स्थानिक परिस्थिती नुसार एक किलोमीटर खडीकरणासह पक्क्या रस्त्याचे अंदाजपत्रक 23 लक्ष 84 हजार 856 रुपये रकमेचे होते. यात मनरेगा अकुशल 9,02,879 रु, मनरेगा कुशल- 6,01,919 रु आणि राज्य रोहयो कुशल – 8, 80,058 रुपये एवढी असणार आहे. यात भौगोलिक परिस्थिती नुसार आणि शासनाच्या दरामध्ये बदल झाल्यास अंदाजपत्रकात बदल होतील.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here