महाराष्ट्र दिनांक 4 एप्रिल ( प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी ( nitin gadkari ) यांनी राज ठाकरेंची ( raj thackeray ) काल मुंबईत भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी नितीन गडकरींनी भेट घेतली. जवळपास दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
गडकरी हे १२ वाजेच्या सुमारास राज यांच्या घरातून बाहेर पडले. यानंतर नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली
ही राजकीय भेट नव्हती. माझे ठाकरे परिवारासोबत कौटुंबीक संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आणि नवीन घर पाहण्यासाठी भेट दिली. ही पूर्णपणे वैयक्तिक भेट होती. आजच्या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आणि कुठलाही राजकीय हेतू नाही, असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.
नितीन गडकरी यांनी ठाकरे कुटुंबासोबत जेवण केलं. यावेळी अमित ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य होते. यावेळी कौटुंबीक चर्चा झाली. जेवणानंतर नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिकरित्या जवळपास पाउण तास राजकीय चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही. नितीन गडकरी यांनी ही वैयक्तिक भेट असल्याचं म्हटलं असलं तरी या भेटीच्या टायमिंगवरून जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे






