वाशिम,दि.03 मार्च (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता १२ वी ४ मार्च ते ७ एप्रील पर्यंत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा इय्यता १० वी १५ मार्च ते ४ एप्रील पर्यंत घेण्यात येणार आहे.
जिल्हयात उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचे शहर व ग्रामीण भागात एकूण १९३ परिक्षा केंद्र असून माध्यमिक शालांत परिक्षेचे एकूण २९३ परिक्षा केंद्र आहेत.
परिक्षा केंद्रावर परिक्षा सुरु असतांना परिक्षेच्या कालावधीत असामाजिक प्रवृत्तीच्या समुदायाकडुन गर्दी होऊन गोंधळ व गैरप्रकार करण्याची शक्यता असल्याने परिक्षा केंद्राभोवती कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने परिक्षा कालावधीत परिक्षा संपेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्राचे ठिकाणी २०० मिटरचे परिक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात येत आहे.
परिक्षा केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.परिक्षा केंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही.परिक्षा केंद्राचे २०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी सहाय्यक कर्मचारी परिक्षार्थी परिक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचेकडुन नियुक्त केलेले अधिकारी सोडुन इतर इसमांना प्रवेशास मनाई राहील.
सदर केंद्रावर २०० मीटरचे आत रस्त्यावरुन वाहन नेण्यास मनाई राहील.परिक्षा केंद्राच्या २०० मीटर परीसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एस.टी.डी./आय.एस.डी.झेरॉक्स फॅक्स/ईमेल/ध्वनीक्षेपके इत्यादी सुविधावर प्रतिबंध घालण्यात येत आहे. परिक्षा केंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडिओ, दुरदर्शन, कॅलक्युलेटर, कॉम्प्युटर वापरण्यावर बंदी घालण्यात येत आहे.सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे.






