वर्धा दि.5 (प्रतिनिधि) :
कोरोनाची वाढती संख्या पाहता शासनाने विवाह समारंभासह राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मेळाव्याच्या उपस्थितींवर निर्बंध आणले आहे. या प्रकारचा कोणताही कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्यास प्रशासनाची परवाणगी घेणे आवश्यक आहे. यासाठी तहसिलदारांना प्राधिकृत अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी नियुक्त केले आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांसाठी 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येते. अंतिम संस्कारासाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा आहे. या सार्वजनिक कार्यक्रमासाठी आयोजकांना परवाणगी घेणे आवश्यक आहे. संबंधित पोलिस स्टेशनच्या नाहरकत प्रमाणपत्राच्या आधारावर स्थानिक तहसिलदार कार्यक्रमांना परवाणगी देतील. शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेत लोकांची उपस्थिती असल्याचे देखील पाहल्या जाणार आहे. पोलिस व स्थानिक प्रशासन याची काटेकोरपणे अंमलबजावणी करतील.
दंडात्मक कारवाईसाठी सहा विभाग प्राधिकृत
शासनाने वेळोवेळी लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लघन करणा-या विरुध्द दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सुध्दा जिल्हाधि-यांनी दिले आहे. दंडात्मक कारवाईसाठी महसूल विभाग, पोलिस विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, नगर पालिका आणि सहकार विभागास प्राधिकृत करण्यात आले आहे.
बेड, ऑक्सिजन व औषधांसाठी नोडल अधिकारी
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने उपजिल्हा रुणालय हिंगणघाट येथील बेड, आयसीयु बेड, व्हेंटीलेटर, औषधे, ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी देवळी तहसिल मधील नायब तहसिलदार शकुंतला पाराजे यांची नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.
रुग्ण संख्या वाढल्यास औषधे व आरोग्य विषयक साहित्याचे तसेच या साहित्याचे व्यवस्थापन निटनेटकेपणाने व्हावे यासाठी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची नोडल अधिकारी म्हणुन तर तहसिलदार माधुरी टेकाडे यांची सहाय्यक नोडल अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी नियुक्ती केली आहे.






