वर्धा, दि 2 सप्टेंबर:- शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची नोंद सातबारावर स्वतः करून घेता यावी यासाठी शासनाने ‘ई पीक पाहणी ॲप’ सुरू केले आहे. सदर ॲपमध्ये शेतकऱ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद कशी करावी याचे प्रात्यक्षिक आज जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्वतः शेतकऱ्यांना करून दाखवले. जिल्हाधिकारी यांनी बरबडी येथील शेत शिवारात भेट देऊन शेतकऱयांशी संवाद साधला आणि ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आश्वस्त केले.
शेतक-यांच्या सातबारावर पिकाची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल विभागाने ई- पिक पाहणी अँप तयार केले. 13 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे अँप कार्यान्वित करण्यात आले. या अँप बाबत शेतकऱ्यांना नेटवर्क आणि सर्व्हर डाऊनच्या समस्या जाणवत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी यासाठी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
बरबडी येथे सोनोबा गुरनुले या शेतकऱ्याच्या शेतात त्यांच्या शेतातील पिकाची नोंद ई पीक पाहणी अँप मध्ये करून दाखवली. शेतात टमाटर, वांगी आणि दोडके या पिकाची नोंद घेण्यासोबतच त्यांच्या शेतातील सिंचन सुविधेची सुद्धा नोंद अँप मध्ये करून दिली. तसेच प्रभाकर लेंडे या शेतकऱ्याच्या शेताची सुद्धा पाहणी करून अँप मध्ये नोंद केली. एका मोबाईलवरून 20 शेतकऱ्यांची पिकाची नोंद घेता येते. त्यामुळे अँड्रॉइड मोबाईल असलेल्या तरुण शेतकऱयांनी त्यांच्या मोबाईलवरून इतर शेतक-यांच्या पिकाची नोंद करून देण्यासाठी पुढाकार घेण्यासोबतच तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक नोंद करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
ई पीक पाहणी अँप शेतकऱ्यांना वापटण्यासाठी अतिशय सोपे असून यामध्ये शेतकरी कधीही त्यांच्या खरीप, रब्बी व उन्हाळी पिकाची नोंद घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा वापर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नोंद करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू असेही त्या म्हणाल्या. यावेळी बरबडी ग्रामपंचायत सरपंच संगीता शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. सोबत उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, तहसीलदार रमेश कोळपे, तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार बाळूबाई भागवत, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच कृषी सहाय्यक उपस्थित होते.






