वीज पडून होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

0
8

यवतमाळ दिंनाक २२ मे (प्रतिनिधी):-

*दामिनी ” ॲप चा वापर करा

*झाडाचा आश्रय घेऊ नये

*बाधित व्यक्तिस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या

मान्सून कालावधीत विशेषतः जून व जुलै महिन्यात विज पडून जिवित हानी होत असते. अशा प्रकारची हानी होवू नये करीता विज पडून होणारी जिवीत व वित्त हानी टाळणे याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून “काय करावे व काय करू नये ” याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.

सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअर वरील “दामिनी अॅप” डाउनलोड करून त्याचा वापर करावा. वादळी वारा/ विजा चमकत असतांना घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा. घराच्या दरवाजे खिडक्या, कुंपणापासून दुर राहा. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच रहावे.

घराबाहेर असताना त्वरित सुरक्षित निवा-याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे. ट्रॅकटर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांचेपासून दूर रहा. गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा.

उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणुन लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहा. जंगलामध्ये- दाट, लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर : दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा.

वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास :

त्वरीत रुग्णवाहीका व वैद्यकिय मदत बोलवा. वाज्राघात बाधित व्यक्तिस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परीस्थितीत, बाधित व्यक्ती व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरुन हायपोथेरमीयाचा (शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल.

 

इजा झालेल्या इसमास खालील प्रमाणे हाताळा :

श्वसन बंद असल्यास :- तोंडावाटे पुनरुत्थान (Mouth-to- Mouth) प्रक्रिया अवलंबावी.

ह्रदयाचे ठोके बंद असल्यास :- कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR करुन सुरु ठेवा.

काय करु नये –

• गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळया जागांवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे,

रेल्वे/बस/सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी ठिकाणे टाळावेत.

घरात असल्यास-

वायरद्वारे जोडले गेलेले फोन / मोबाइल व इतर इलेक्ट्रीक / इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस

लावू नये. गडगडीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नका. या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्ये करु नयेत. कॉक्रीटच्या (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहु नये. धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरींग व इलेक्ट्रीक मिटर अशा प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा.

घराबाहेर असल्यास –

मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा

झाडांजवळ उभे राहु नका. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या (cables) पासून लांब रहा.

*“दामिनी ” ॲप च्या वापराबाबत*

विज पडुन जिवीत हानी होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी

दिल्ली यांनी “दामिनी ” ॲप तयार केले असुन सदरचे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करण्यात आले आहे.

सदरचे ॲप जिपीएस लोकेशन ने काम करीत असून

विज पडण्याच्या १५ मिनिटापुर्वी सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.

 

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी / कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी/मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, महसूल सहायक गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर तसेच इतर सामान्य नागरीक यांनी हे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा व इतरांनाही त्याचा वापर करण्यास प्रवृत्त करावे.

सदर अॅपमध्ये प्राप्त होणा-या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. सभोवताल विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना निर्देश देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here