यवतमाळ दि. 14 एप्रिल (प्रतिनिधी) :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक समता, एकता व बंधुता प्रस्तापीत केली. त्यामुळे सर्व घटकांचा एकत्रित विकास करणे शक्य झाले. मागील 75 वर्षात समाजाला दिशा देण्याचे व न्याय मिळवून देण्याचे काम संविधानाने केले आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून आपणही सुजाण नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करावा, तसेच सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक न्याय भवन येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार संजय राठोड हे होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. माधव कुसेकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त दिलीपकुमार राठोड, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाउराव चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण, संशोधन अधिकारी मंगला मुन, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी राहुल कराळे, गौरव गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी महापुरूषांना एका घटकापुरते मर्यादित ठेवण्याच्या अज्ञानातून बाहेर येण्याची गरज प्रतिपादित केली.
आमदार संजय राठोड यांनी यावेळी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता, न्याय, व बंधुत्व निर्माण केले. त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका बजावली. आज राज्य शासन देखील सामाजिक न्याय विभागाच्या व इतर वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करून बाबासाहेबांचा वारसा पुढे चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाउराव चव्हाण यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत 6 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत आयोजित विविध कार्यक्रमाची माहिती दिली.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप, सबळीकरण योजनेअंतर्गत शेतजमीनीच्या सातबारा प्रमाणपत्राचे वाटप व स्वयंरोजगाराकरिता अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त रक्तदान करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
समता रॅली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी सामाजिक न्याय विभागाद्वारे समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आझाद मैदानाजवळील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. ही रॅली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून जुने बस स्टँडजवळील संविधान चौकात आल्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर रॅलीची सांगता सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आली.
कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभाग, जात पडताळणी समिती, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थीत होते.






