बंदी भागातील ढाणकी ते बिटरगाव रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी येडगे

0
7

यवतमाळ दि. 12 एप्रिल, (प्रतिनिधी) :

जिल्ह्यात विविध विकास योजनांमधून पायाभूत सुविधांसाठी मंजूरी देण्यात आलेली आहे. यातील महत्वाचे जोडरस्ते, पुल, प्रशासकीय इमारती, आरोग्य सेवा इमारती, शाळा,अंगणवाड्या, विश्रामगृह आदिंचे बांधकाम व दुरूस्तीची कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी.

या महिन्यात मंजूरी मिळालेली कामे पुढील दीड महिन्यात सुरू करण्यात यावी. विकास निधी परत जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

पायाभूत सुविधा प्रकल्प व विविध विभागातील समन्वयाबाबत जिल्हाधिकारी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. बैठकीला उपवनसंरक्षक आनंद रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कुटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, प्रशांत थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण, सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता पुजा पवार, विद्युत विभागाच्या उपअभियंता श्रीमती बोडखे, शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, मागील वर्षी पावसाळ्यात उमरखेड येथे बस दुर्घटना घडली होती. अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे तसेच पुलाचे नादुरूस्त कठडे व वापरण्यास अयोग्य पुलाचे बांधकाम तसेच दुरूस्तीची कामे त्वरीत करून नागरिकांची गैरसोय टाळावी.

जिल्ह्यात 314 शाळा दुरूस्ती व 72 वर्गखोल्यांच्या बांधकामाची मंजूरी देण्यात आली आहे. ही कामे नवीन शालेय वर्ष सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, सबसेंटर, अंगणवाडी बांधकाम आदिंबाबतदेखील त्यांनी आढावा घेतला. चालू आर्थिक वर्षात शासकीय जागा उपलब्ध असलेल्या किमान 100 अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट त्यांनी दिले.

आरोग्य केंद्रांची दुरूस्ती करतांना यापुढे तेथे कोणतीही अडचण उद्भवणार नाही या दूरदृष्टीने दुरूस्तीच्या सर्व कामांचा समावेश करण्याचे त्यांनी सांगितले. करंजी व झरी येथे ग्रामीण रूग्णालय तयार झाल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र पडा व मुळगव्हाण येथे स्थलांतरीत करण्याच्या प्रक्रीयेला गती देण्याचेही त्यांनी सांगितले.

खत रॅक साठी पिंपळगाव येथे रस्ता बांधकाम पूर्ण करण्याबाबत पांढरकवडा बांधकाम विभागाने त्वरीत कारवाई करण्याचे तसेच बंदी भागातील ढाणकी ते बिटरगाव रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.

वनपर्यटनामुळे पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पांढरकवडा, वणी व पुसद येथील विश्रमागृह दुरूस्ती व विस्तारित नवीन विश्रामगृह बांधकामाची कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी येडगे यांनी बैठकीत दिले.

बैठकीला महसूल, वन, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण व इतर संबंधीत यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here