यवतमाळ दि. 21 मार्च, (प्रतिनिधी)
गुटका विरोधी कायद्यानुसार तंबाखूजन्य पदार्थांची तपासणी करा
खर्रा मशीन बेकायदेशीर
शितपेयाचे नमुने तपासा
आता उन्हाळा ऋतू सुरू होत असून या दिवसात नागरिकांकडून शित पदार्थ व शित पेयांना अधिक मागणी असते, त्यानुसार विहित नियमांचे पालन करून शित पदार्थांची गुणवत्ता योग्य प्रमाणात राखल्या जाते की नाही याबाबत अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करावी. नागरिकांना सुरक्षीत व गुणवत्तापुर्ण अन्न पदार्थ न देता गैरप्रकार करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात घेण्यात आली. यावेळी अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त कृष्णा जयपूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुटका विक्रीची तपासणी करण्याचे व बेकायदेशीर खर्रा मशीन बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिले. नियमित अन्न तपासणीसोबतच विक्रीसाठी येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे व नागरिकांच्या हक्काबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने जनजागृती करण्याबाबत जिल्हाधिकारी येडगे यांनी सूचना दिल्या.
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती कृष्णा जयपूरकर यांनी बैठकीत सादर केली.
बैठकीला संबंधीत अधीकारी उपस्थित होते.






