दुचाकी वरील एक तरुण जागीच ठार, तर दुसऱ्या तरुणाचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू..
एटापल्ली, दि. ४ जून :- एटापल्ली तालुक्यात पुन्हा एकदा भरधाव वाहनाच्या धडकेत निष्पाप तरुणाचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. एटापल्ली तालुक्यातील मौजा आलदंडी गावाजवळ आज दिनांक ४ / ६ / २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघातात परसलगोंदी येथील एका २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी अवस्थेत असल्यामुळे त्याला दवाखान्यात नेत असताना त्याचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे कळते आहे. मिळालेल्या माहितीनुसार MH 34- CD 0800 क्रमांकाची प्रायव्हेट इनोव्हा क्रिस्टा गाडी भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार सदर बाईक सवार व्यक्ती दारू पिऊन गाडी चावत असल्यामुळे ते आपल्याच धुंदीत असल्याचे बोलल्या जात आहेत. सदर (अपघात )धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात अनिल हिचामी (वय २८, रा. पलसगोंदी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्याप्रमाणे, धडकेचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला होता. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमली आणि नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातात गंभीर जखमी झालेला बालाजी दुर्वा (रा. पलसगोंदी) याला प्रथम एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले होते परंतु त्यांचाही मृत्यू झाल्याचे कळते आहे.
“सदर परिसरात वाढत्या दारूचा परिणाम”____पोलिस प्रशासन लक्ष देणार का ? जनतेचा सवाल__ सदर परिसरात दारूचा वाढता परिणाम लोकांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दारू तस्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. आणि या परिसरातील संपूर्ण दारू विक्री बंद करावी जेणेकरून दारूपीऊन कोणत्याची निष्पाप व्यक्तीचा जीव जाणार नाही. आलदंडी येथे पोलिस स्टेशन असून या परिसरात दारूचा महापूर वाहतो.
घटनेची माहिती मिळताच आलदंडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग तसेच चालकाची निष्काळजीपणा याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पलसगोंदी गावावर शोककळा पसरली असून नातेवाईक व ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. वाढत्या रस्ते अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आणि या परिसरातील सर्व दारू विक्री बंद झाली पाहिजे असे बोलल्या जात आहे. पुढील तपास आलदंडी पोलीस करीत आहेत.






