वर्धा दिनांक 15 जानेवारी (प्रतिनिधी)
फक्त वर्धाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या आर्वी गर्भपात प्रकरणी आणखी नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे
आर्वी येथील गर्भपात प्रकरणात सकाळपासून नागपूर आणि वर्ध्यातील फॉरेन्सिक एक्सपर्ट तसेच आरोग्य विभागाच्या चमूने तपासणी करून कदम हॉस्पिटलमधील पापाचे खोदकाम केले असून आणखी एक कवटी तपास पथकाच्या हाती लागली.
या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी बायोगॅस खड्ड्यातून गुरुवारपर्यंत ११ मानवी कवट्या आणि ५४ हाडे जप्त केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नागपूर आणि वर्ध्यातील फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स तसेच आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांसह पोलिसांनीही कदम हॉस्पिटलच्या आत व बाहेर तपासणी केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, ठाणेदार भानुदास पिदुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनवणे, पाेस्को सेलच्या ज्योत्सना गिरी यांच्यासह मोठा पोलीस ताफा उपस्थित होता. खबरदारी म्हणून तपासणी व चौकशीदरम्यान कुणालाही रुग्णालय परिसरात फिरकू देण्यात आले नाही. तपास पथकाने बायोगॅसचा टॅंक तसेच गडर टॅंकही स्वच्छता कर्मचाऱ्याच्या हाताने तपासून घेतली. या तपासणीत मेडिकल बायोवेस्टसह वेगवेगळे संशयास्पद साहित्य पोलिसांच्या हाती लागले.
खोदकामात सुटली दुर्गंधी
रुग्णालय परिसरात खोदकामादरम्यान प्रचंड दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे या खड्ड्यात आणखी काही अवशेष सापडतात काय, हेदेखील तपासण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत बायोगॅस खड्ड्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू होती.






