कवठा येथील दोन पांदनरस्त्याचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते भूमिपूजन

0
14

वर्धा, दि.18 (प्रतिनिधि) :ग्रामीण भागात वहीवाटीसाठी पांदन रस्त्याचे अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे पांदन रस्त्यांची कामे हाती घेण्याची सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी केली होती. त्याप्रमाणे हे रस्ते मोकळे करण्याच्या कामास जिल्हयास सुरवात झाली आहे. देवळी तालुक्यातील कवठा रेल्वे येथील दोन पांदन रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी राज्यमंत्री आमदार रणजित कांबळे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसिलदार राजेश सरवदे, सरपंच दिपमाला नेहारे, उपसरपंच, सदस्य व गावकरी, नरेश दांदळे, मधुकर रेवतकर, मोरेश्वर डहाके, भाऊराव पांडे, मदनलाल जयस्वाल, किशोर जयस्वाल, आशिष झोटींग, रमेश दांदळे, अनिल मानकर आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

पांदन रस्ते मोकळे करुन देण्याची जिल्हयात ठिकठिकाणी शेतक-यांची मागणी होती. त्यामुळे पांदन रस्त्यांचा कार्यक्रम घेण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी मागील बैठकीत दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाभर हे रस्ते मोकळे करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

कवठा येथील कवठा ते मलकापूर व कवठा ते लक्ष्मीनारायनपूर या प्रत्येकी दीड किलोमीटर लांबीच्या दोन पांदनरस्त्याचे काम करण्यात येणार आहे. दोनही रस्ते प्रत्येकी 22 फुटाचे असून रस्त्याच्या दोनही बाजूस प्रत्येकी अडीच फुटाची नाली खोदकाम केल्या जातील. नालीतील माती रस्त्यावर टाकून रस्ता वहीवाटीसाठी अधिक चांगला बनविण्यात येणार आहे. रस्त्यावर झालेले अतिक्रमन देखील काढून टाकण्यात येणार आहे.

सदर दोनही रस्त्याचे काम लोकवर्गणी व कंपन्यांच्या समाजिक दायित्व निधीतून होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तथा आमदार रणजित कांबळे यांनी गावक-यांशी संवाद देखील साधला. भूमिपूजन कार्यक्रमास गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here