नविन वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याबाबत जिल्हाधिका-यांचे आदेश 

0
10

वर्धा, दि.30 दिसंबर (प्रतिनिधी) :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठया प्रमाणावर एकत्र न येता या वर्षीचा 31 डिसेंबर व नविन वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहे.

नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता शक्यतोवर घरीच साधेपनाने साजरे करावे. रात्री ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आलेल्या आदेशाचे पालन करावे. नविन वर्षाच्या स्वागताकरीता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेतील कार्यक्रमाच्या उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवाणगी असेल.

सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष दयावे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. 60 वर्षावरील नागरीकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सामाजिक अंतर राखावे. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व मिरवणूका काढू नये.

नुतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात अशावेळी त्या ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतर राखण्याचे पालन करावे. तसेच संबंधित आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनीप्रदुषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात नमुद आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here