योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 100 टक्के पर्यंत अनुदान
अनुदानाची रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यात
आतापर्यंत 70 कोटींचे अनुदान वाटप
जिल्हाधिका-यांकडून योजनेचा आढावा
वर्धा, दि. 27 :(प्रतिनिधी)
राज्य शासन व जागतिक बँकेच्या सहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत शेतक-यांना वेगवेगळया बाबींसाठी 50 ते 100 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. जिल्हयात 125 गावांचा योजनेत समावेश करण्यात आला असून या गावातील पात्र शेतक-यांना 70 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. कृषी संजीवनी ही सर्वाधिक अनुदान देणारी योजना आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतक-यांना या योजनेत समाविष्ठ करा, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांनी कृषी संजीवनी योजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक वैभव लहाने, उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रविण मुळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या योजनेसाठी तीन टप्प्यात गावांची निवड करण्यात आली आहे. 65 ग्रामपंचायतींमध्ये 125 गावांचा समावेश करण्यात आला आहे. योजने अंतर्गत शेतक-यांना वृक्ष लागवड, फळबाग लागवड, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, भाजीपाला पिकांची लागवड, बंदिस्त शेळीपालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, कृषी आधारीत उद्योग, गांडूळखत व नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, फलोत्पादन यंत्रे, पिकसंरक्षक उपकरणे, पेरणी यंत्र याबाबीसाठी अनुदान दिले जाते. इतर कोणत्याही योजनेतून देण्यात येणा-या अनुदानापेक्षा या योजनेतून देण्यात येणारे अनुदान हे खूप जास्त आहे. काही योजनांना तर 100 टक्के अनुदान दिले जाते.
निवडण्यात आलेल्या गावांमध्ये 22 हजार 500 खातेदार शेतक-यांचा समावेश आहे. बहुतांश शेतक-यांकडून योजनेसाठी अर्ज प्राप्त झाले असून यातील निकषास पात्र ठरलेल्या शेतक-यांना 70 कोटी रुपयांचे अनुदान आतापर्यंत वितरण करण्यात आले आहे. ज्या ग्राम पंचायती मध्ये योजना राबविली जाते. त्याठिकाणी ग्राम संजीवनी समित्या देखील स्थापन करण्यात आल्या आहे. योजने अंतर्गत पात्र शेतक-यांना अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
ही योजना शेतक-यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून मोठया प्रमाणावर शेतक-यांना अनुदान मिळते. ठिंबक व तूषार सिंचन सारख्या बाबी शेतक-यांच्या उत्पादनात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे निवडलेल्या गावांमधील जास्तीत जास्त शेतक-यांना या योजनेत समाविष्ठ करुन घ्या. त्यासाठी या गावांमधील शेतक-यांमध्ये जनजागृती करा, असे निर्देशही जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले.






