वर्धा दिनांक 22 दिसंबर (प्रतिनिधि)
जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून वाळू चोरीकरुन वाहतूक करीत असताना ट्रॉली पलटी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे.ही घटना अडेगाव येथे घडली आहे. अपघात होताच गावक-यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती.
अनिल सुरेश लाकडे(३३) व ऋतिक दिनेश वानखेडे (२४) दोघेही रा. इंदिरानगर देवळी, असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले तर ट्रॅक्टर चालक शंकर मनोहर भानारकर, सागर विजय पारिसे, शिवराम डोंगरे, सचिन नांदूरकर व गजानन भानाकर सर्व रा. इंदिरा नगर हे गंभीर जखमी आहे.
सोनेगाव (बाई) येथील वाळू घाट आणि नाल्यातून गेल्या काही दिवसांपासून देवळीतील एका दारुविक्रेत्यासह नगरसेवकाने अवैधरित्या वाळू उपसा चालविला आहे. घटनेतील सर्व व्यक्ती एम.एच.३२ ए.एच.८७०३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून वाळू आणण्याकरिता जात होते. दरम्यान अडेगाव येथे भरधाव असलेल्या ट्रॅक्टर-टॉलीचा मधातील रॉड तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर समोर निघून गेला तर ट्रॉली मागे राहून पलटी झाली.
परिणामी ट्रॉलीत दबून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. या सर्व मजुरांनी सोनेगावातील नाल्यावरुन रात्रभर ट्रीप मारल्याचे गावकरी सांगतात. या प्रकरणी देवळी पोलिसांनी नोंद घेतली असून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.






