शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे
भावना गवळी यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहा म्हणून समन्स बजावलं आहे. 20 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भातलं हे समन्स आहे
याआधी 29 सप्टेंबरला त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांना 4 ऑक्टोबरला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. आता पंधरा दिवसांनी त्यांना दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे.
ईडीने गेल्या महिन्यात खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना अटक केली. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप झाले आहेत.
भावना गवळी यांच्या आईसह सईद खान हे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक होते. 2019 मध्ये या संस्थेला फर्ममध्ये सामील करून घेण्यात आलं. त्यापूर्वी ट्रस्ट होती. या ट्रस्टमध्ये स्वतः भावना गवळी आणि त्यांची आई शालिनीताई या सदस्य होत्या. ट्रस्टचे रुपांतर फर्ममध्ये करत असताना धर्मादाय आयुक्तालयात फसवणूक केली गेली असल्याचा ईडीला संशय आहे. त्याचबरोबर फर्मचा वापर फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसाठी केल्याचाही संशय आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भावना गवळी यांच्याशी संबंधित या ट्रस्टच्या व्यवहारात 17 कोटींची अनियमितता आढळून आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीश सारडा यांचा आरोप आहे की, भावना गवळी यांनी बालाजी सहकारी पार्टिकल मंडळाच्या माध्यमातून 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेऊन राष्ट्रीय सहकारी विकास परिषदेची फसवणूक केली आहे. भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून दहा वर्षांसाठी पैसे घेतले होते. पण प्रत्यक्षात कंपनी सुरूच केली गेली नाही,’ असा सारडा यांनी केलेला आहे. याच प्रकरणी आता ईडीने भावना गवळी यांना समन्स बजावलं आहे.






