शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधांचा तुडवडा पडू देणार नाही – पालकमंत्री संदिपान भुमरे

0
12

पालकमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण व विविध विकास कामाचे भूमिपूजन 

  यवतमाळ दि. 02 ऑक्टोबर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषधांचा कुठलाही तुडवडा पडणार नाही व स्वच्छतेची कुठेही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात येईल व रुग्णालयातील अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिली.

आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून शासकीय रुग्णालयास कार्डिॲक रुग्णवाहीका भेट देण्यात आली. या रूग्णवाहीकेचे लोकार्पण पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की कार्डिॲक लॅब असणारी रुग्णवाहीका उपलब्ध होणारे यवतमाळ हे शक्यतो एकमेव शासकीय रूग्णालय आहे, या ॲम्ब्युलन्सचा रुग्णसेवेसाठी चांगला उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, तसेच रुग्णवाहिका भेट दिल्याबद्दल आ. चतुर्वेदी यांना धन्यवाद दिले. पालकमंत्री झाल्यापासून आपण महाराष्ट्रात सर्वांधिक 43 ॲम्ब्युलन्स यवतमाळ जिल्ह्यासाठी उपलब्ध केल्या असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमासाठी शाहीद रियाणी, हरीषभाउ कुडे, अभ्यागत मंडळ सदस्य राजेंद्र गायकवाड, जिल्हा परिषद सभापती श्रीधर मोहोड, पराग पिंगळे, संतोष ढवळे, शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.गिरीष जतकर, कान-नाक व घसाशास्त्रचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.एच. गवार्ले, न्यायवैद्यकशास्त्रचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.ए.के.बत्रा, विभाग प्रमुख प्रा. डॉ.आर.पी.चव्हाण, डॉ.बी.एस.येलके, वैद्यकीय अधिक्षक डॉ.शरद मानकर, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ.महेंद्र वरठी, सहायक प्राध्यापक डॉ.चेतन जनबादे, अपघात विभागाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद कुडमेथे, प्रशासकीय अधिकारी संतोष झिंजे व इतर विभागाचे डॉक्टर्स व सिस्टर्स उपस्थित होते .

*विकास कामांचे भूमिपूजन*

आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून प्रभाग क्र. 3 मध्ये रू. 33 लाख 20 हजार प्रशासकीय मान्यतेची सात कामे व प्रभाग क्रं.7 मध्ये रू. 22 लाख 30 हजार प्रशासकीय मान्यतेची 5 कामे सुरू करण्यात येत असून त्याचे भूमिपूजन पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे घेण्यात यावी, यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here