वाशिम दिनांक 01 जुलाई (प्रतिनिधी) :
जिल्हयाचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारने वाशिम जिल्हयाचा समावेश आकांक्षित जिल्हा म्हणून केला आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत माहे मे 2022 मध्ये आरोग्य व पोषण आणि शिक्षण या क्षेत्रात जिल्हयाने चांगली कामगिरी केल्याने जिल्हयाच्या रँकमध्ये सुधारणा झाली आहे.
आकांक्षित जिल्हा कार्यक्रम डॅश बोर्डवरील निर्देशांकाच्या कामगिरीच्या आधारावर निती आयोगामार्फत मे 2022 या महिन्याच्या जाहिर रँकनुसार जिल्हयाने एप्रिल 2022 च्या तुलनेत 83 वरुन 13 वी डेल्टा रँक प्राप्त केली आहे. तसेच आरोग्य व पोषण या क्षेत्रात 8 वा, शिक्षण क्षेत्रात 8 वा, कृषी व जलसंधारण क्षेत्रात 14 वा आणि मुलभूत सुविधामध्ये 15 वा रँक प्राप्त झाला आहे.
या क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे जिल्हयाने चांगला रँक प्राप्त केला आहे. आरोग्य व पोषण एप्रिल महिन्याच्या तुलनेत गरोदर मातांची 100 टक्के नोंद, पुरक आहार पुरविणे, स्त्री-पुरुष प्रमाणात सुधारणा, क्षय रुग्णांची मोठया प्रमाणात शोध मोहिम व त्यांच्या उपचाराच्या प्रमाणात वाढ, सॅम व मॅम बालकांमध्ये सुधारणा दिसून आली आहे.
कृषी क्षेत्रात सिंचनामध्ये वाढ झाली आहे. जनावरांचे लसीकरण व माती परिक्षण प्रमाणपत्र यामध्ये देखील वाढ झाली असून घरकुल योजनेअंतर्गत पुर्ण झालेल्या घरांची संख्या देखील वाढली आहे. जिल्हयाचे मागासलेपण दूर करण्यासाठी आरोग्य व पोषण, कृषी व जलसंधारण, शिक्षण, मुलभूत सुविधा आणि कौशल्य विकास व वित्तीय व्यवस्थापन या क्षेत्रात काम करण्यात येत आहे.
जिल्हयाने चांगली रँक प्राप्त केल्याने संबंधित यंत्रणांनी आपल्या कामाचे सातत्य असेच ठेवून आणखी चांगली कामगिरी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या आहे.





