शिवसेनेचे उपनेते आणि युती काळातील राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. वर्धाच्या हिंगणघाट येथील माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचं ठरवलं आहे. दिल्लीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशोक शिंदे यांच्यासोबत ठाणे, भिवंडी येथील सुरेश म्हात्रे यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. सुरेश म्हात्रे यांनी याआधीच शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसणार आहे.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून अशोक शिंदे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्याचसोबत युती सरकारच्या काळात अशोक शिंदे(Ashok Shinde) यांच्याकडे उद्योग राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. १९९५ मध्ये पहिल्यांदा अशोक शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर विदर्भातील वर्धा जिल्ह्यात निवडून आले होते. मागील काही दिवसांपासून पक्ष संघटनेतील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनंत गुढे यांच्यासोबत त्यांचे वाद होते. या प्रकरणी पक्षनेतृत्वाकडे न्याय मागूनही मिळाला नाही त्यामुळे अशोक शिंदे काँग्रेसच्या वाटेवर गेले आहेत.





