वर्धा दिनांक 30 जून (प्रतिनिधी) :
श्री क्षेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशी यात्रेनिमित्त जाणा-या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने 6 जुलै पासुन जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.
वर्धा आगारातून 25, आर्वी आगारातून 10, हिंगणघाट 15 तळेगाव व पुलगाव आगारातून प्रत्येकी 5 अशा 60 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. वर्धा ते पंढरपूर करीता पूर्ण तिकीट 905 रुपये तर जेष्ठ नागरिकांसाठी 455 रुपये, आर्वी ते पंढरपूर पूर्ण तिकीट 895 रुपये तर जेष्ठ नागकिरांसाठी 450 रुपये, हिंगणघाट ते पंढरपूर पुर्ण तिकीट 1 हजार 60 रुपये तर जेष्ठ नागरिकांसाठी 530 रुपये, तळेगाव ते पंढरपूर पुर्ण तिकीट 950 रुपये तर जेष्ठ नागरिकांसाठी 480 रुपये, व पुलगाव ते पंढरपूर पूर्ण तिकीट 890 रुपये तर जेष्ठ नागरिकांसाठी 450 रुपये आकारण्यात येणार आहे.
गावकरी समुह, वारकरी समुह, भजनी मंडळ व मंदीर समिती यासारख्या समुहास एकत्रित थेट प्रवासाची सोय मिळावी याकरीता ॲडव्हॉन्स बुकींग सोय सर्वच बसस्थानकावर करण्यात आली आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना तिकिट दराच्या सवलतीसह ॲडव्हाँस बुकींग सुविध उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घेण्यासाठी संबंधित आगार प्रमुखाशी संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.






