वर्धा दिनांक 1 जून (प्रतिनिधी) :
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस, वादळ, वारे, विजा कोसळने अशा प्रकारच्या घटना घडत असतात. या दिवसात विविध प्रकारची आपत्ती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. अशी परिस्थिती उद्भवल्यास नागरीकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने काही खबरदारी उपाययोजना जारी केल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.
आकाशात विजा चमकत असतांना जास्त दक्ष राहणे आवश्यक आहे. विजा चमकत असताना शेतात काम करीत असल्यास शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा. पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा. पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.
ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे. पोहणारे, मच्छिमारी करणाऱ्या व्यक्तींनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे. झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे. एखादे उंच झाड सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे. पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.
आपले घर, शेत इत्यादींच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत. जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा. वृक्ष, दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा.
मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा एखाद्या छोट्या झाडाखाली आसरा घ्यावा. असे शक्य नसल्यास जमिनीपासून खालील खोलगट ठिकाणी गुडघ्यात वाकून बसा. चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच रहावे.
आकाशात विजा चमकत असताना काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. जसे खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात. झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका.
गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करू नका. वाहनाच्या बाहेर थांबणे फारच आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.
एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तीमध्ये किमान 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका. पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका, शिवाय त्यापासून दूर रहा. विजेवर चालणारे यंत्र इत्यादीपासून दूर रहा. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका. मोबाईलचा वापर टाळा.
विजेचा प्रकाश आणि आवाज यात 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्हाला विजेपासून धोका आहे. अशावेळी तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता 80% आहे. वीज तुमच्या आसपासच्या पाच किमी अंतरावर पडत आहे, अशा वेळेस सुरक्षित जागेचा आसरा घ्या.
शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे. विज कोसळतांना किंवा वादळ होतांना सुरक्षित ठिकाण न मिळाल्यास एखादा पूल शोधा. पुलाच्या लोखंडी तुळ्या-कमानिंना स्पर्श करु नका. तुमच्या दुचाकीपासून दुर अंतरावर थांबा. शक्यतो कोरड्या जागेवर य़ांबा.
जर उच्च दाबाच्या विद्युत तारा रस्त्याच्या एका बाजुकडून दुसऱ्या बाजूकडे जात असतील आणि त्याखाली आसरा घ्यायचा असेल तर ज्या उंच मनोऱ्यांना ह्या तारा जोडलेल्या असतील, त्याच्या खूप जवळ जाऊ नये. मनोऱ्यापासून कमीत-कमी 50 फुट अंतर असावे. जर विज ह्या तारांवर किंवा मनोऱ्यावर कोसळली, तर विजेचा प्रवाह सुरक्षितपणे या तारांतून जमिनीत निघून जावा, अशीच या तारा व मनोऱ्यांची रचना असते.
नागरिकांना पावसाळ्यात विज व वादळापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनने सुचविलेल्या उपाययोजनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कळविले आहे.






