मंगरूळपीर तालुक्यातील कोरोना लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0
7

लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना

• कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करा

वाशिम, दि. १५  : मंगरूळपीर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या उपस्थितीत आज, १५ जून रोजी तहसील कार्यालयात आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. मंगरूळपीर तालुक्यातील लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून जनजागृतीवर विशेष भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार नरसय्या कोंडागुरले, गट विकास अधिकारी  परिहार, पोलीस निरीक्षक जगदाळे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ. अरविंद भगत, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. लुंगे, गटशिक्षणाधिकारी श्री. पावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी कोरोना लसीकरण मोहीम, कोरोना चाचण्या, बाधितांचे संस्थात्मक विलगीकरण, मॉन्सूनपूर्व तयारी आदी बाबींचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी काही दिवसांत कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. तत्पूर्वी जास्तीत जास्त व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देवून सुरक्षित करणे आवश्यक आहे. सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जात असून तालुक्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. ४५ वर्षांवरील किती व्यक्तींनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही, याची गावनिहाय माहिती घेवून त्यांच्या लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करावेत. कोरोना लसीकरणविषयी नागरिकांच्या मनात काही गैरसमज असल्यास ते दूर करून त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे. यासाठी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी.

सध्या शेतीतील कामे सुरु असल्याने शेतकरी, मजूर वर्ग दिवसभर शेतीमध्ये असतो. त्यामुळे त्यांना सोयीस्कर अशा वेळेस सकाळी किंवा सायंकाळी लसीकरण सत्र आयोजित करावीत. त्याविषयीची माहिती संबंधित गावांमध्ये एक-दोन दिवस अगोदर देवून लसीकरणासाठी लोकांना आवाहन करावे, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण सध्या कमी असले तरी कोरोना चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अधिक सतर्कपणे चाचण्या करून बाधितांचा शोध घ्यावा व त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवावे. तसेच मॉन्सून कालावधीत येणारे साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here