लवकरच वाशिम येथे अन्न-औषध चाचणी प्रयोगशाळा सुरु होणार

0
7

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी वाशिम येथे अन्न-औषध चाचणी प्रयोगशाळा: उभारणीचे काम वेगात पूर्ण करण्याचे ना. डॉ. शिंगणे यांचे निर्देश

– जनतेला चांगल्या दर्जाचे प्रमाणित अन्न पदार्थ व औषधे मिळण्याकरीता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा महत्वाची भूमिका पार पाडतात. अशा प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे कार्यरत आहेत. अशाच प्रयोगशाळा राज्याच्या अन्य भागातही सुरू करण्याचे शासनाचे नियोजन असून त्यानुसार अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या पाच जिल्ह्यांसाठी वाशिम येथे अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीचे काम वेगात पूर्ण करा तसेच प्रयोगशाळेतील पदनिर्मितीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा,असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिले.

ना. डॉ. शिंगणे हे सोमवारी (दि.१४) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मूर्तिजापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी अमरावती विभागातील सह आयुक्त (अन्न) सुरेश अण्णापुरे, सह आयुक्त अशोक बरडे, सहा. आयुक्त घरोटे, सहा. आयुक्त (औषधे) विनय सुलोचने, सागर तेरकर, हेमंत मेटकर, अन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे आदी उपस्थित होते.

ना. डॉ. शिंगणे म्हणाले की, राज्यामध्ये अवैध गुटखा, प्रतिबंधात्मक अन्न पदार्थ विक्री रोखण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. अमरावती विभागातही अवैध गुटखा विक्री होत असल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी.

ते पुढे म्हणाले की, म्युकर मायकोसिस आजार कोविड रूग्णसंख्या कमी होत असल्यामुळे कमी होत आहे. या आजारावरील औषधे महागडी असून त्याचे रेशनिंग आवश्यक आहे. म्युकर मायकोसिस वरील अँटी फंगल औषधांचा तुटवडा होवू देवू नये. ही औषधे शासकीय रूग्णालयांमार्फतच रूग्णांना देण्यात येत असून खाजगीमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यासाठी शासन सकारात्मक असून लवकरच रिक्त पदांची भरती घेण्यात येणार आहे. तसेच दुध, अन्न पदार्थ तपासण्यात यावेत. भेसळीचे प्रमाण निदर्शनास आल्यास तपासणीचे प्रमाण वाढवावे.

कोरोना विषाणू संसर्ग प्रभाव बघता अन्न पदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छता पाळावी. उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करू नये. याबाबत विभागाने मोहिम राबवून अन्न पदार्थ तपासावेत. कुठेही अन्न पदार्थांमुळे अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश डॉ शिंगणे यांनी दिले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here