कृषि विभागाच्या भरारी पथकाची धडक कार्यवाही, दोन कृषि केंद्राचे परवाने निलंबित

0
14

वर्धा दिनांक 26 मई (प्रतिनिधी) :

शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणुन दि.1 जुन पर्यंत कृषि केंद्राना कापूस बियाणे विक्री करण्यास मनाई आदेश निर्गमित करण्यात आले होते.असे असतांना कृषि केंद्रामधून कापूस बियाणे विक्री होत असल्याचे कृषि विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कार्यवाहीत आढळून आले. त्यामुळे बियाने विक्री करणाऱ्या दोन कृषि केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले असून सहा कृषि केंद्रांना दोन दिवसात खुलासा सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

कापसावरील शेंदरी बोंडअळीचा जिवनक्रम हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यामुळे खंडीत न झाल्याने पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढत आहे. हा अनुभव लक्षात घेता खरीप हंगाम 2022 मध्ये शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावास आळा घालावयाचा असल्यास शेंदरी बोंअळीचा जिवनक्रम खंडीत करण्यासाठी हंगामपुर्व कापसाची लागवड होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषि केंद्राना दि.1 जुन पर्यंत कापूस बियाणे विक्री करु नये, असे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार कृषि विभागाच्या भरारी पथकाने दि.24 मे रोजी वर्धा शहरातील 8 कृषि सेवा केंद्राची तपासणी केली असता मे.कोठारी कृषि सेवा केंद्र, मोहता मार्केट या कृषि केंद्रातुन कापुस बियाणे विक्री झाल्याचे आढळून आल्याने त्यांचा बियाणे परवाणा पुढील 6 महिन्याकरीता निलंबित करण्यात आला.

तसेच मे चांडक ट्रेडर्स या कृषि केंद्रामध्ये कागदपत्राची अनियमितता आढळून आल्याने 3 महिन्यांकरीता बियाणे परवाणा निलंबित करण्यात आला. तर मे राठी ट्रेडर्स, मे चांडक ॲग्रो सेंटर, अक्षय सिड्स, मे चांडक ब्रदर्स, वानखेडे ॲग्रो सेंटर व आदर्श ॲग्रो एजन्सी या कृषि केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावून दोन दिवसात खुलासा सादर करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

जिल्हयात इतर ठिकाणी जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय भरारी पथकाव्दारे कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान अनियमितता केल्याचे आढळून आल्यास दोषीवर कडक कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदर कार्यवाही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनील इंगळे, कृषि विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण, उपविभागीय कृषि अधिकारी अजयकुमार राऊत, मोहिम अधिकारी संजय बमनोटे, कृषि अधिकारी मनोज नागपूरकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक परमेश्वर घातिडक यांनी केली, असे परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here