वर्धा दिनांक 5 मे ( प्रतिनिधी)
40 ग्रामपंचायतीमधील 55पदासाठी निवडणूक
5 जुनला होणार मतदान
आदर्श आचार संहित लागू
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. जिल्हयातील 40 ग्रामपंचायतीतील 55 रिक्त पदासाठी दि.5 जुनला मतदान होणार आहे. आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली असून आचार संहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
दि.5 मे रोजी तहसिलदार निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करणार. दि.13 मे ते 20 मे या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत (दि.15 व 16 सुटी वगळून) नामनिर्देशनपत्र मागविणे व सादर करण्यात येईल. दि.23 मे रोजी सकाळी 11 वाजतापासुन नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल. दि.25 मे दुपारी 3 वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात येईल व दुपारी 3 वाजतापासुन निवडणूक चिन्ह वाटप व अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.
दि.5 जुन रोजी सकाळी 7.30 पासुन सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आवश्यक असल्यास मतदान घेण्यात येईल. दि.6 जुन रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे. मतमोजणीचे ठिकाण जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार ठरवतील. दि.9 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल.
वर्धा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीतील 4 जागांसाठी, सेलू 8 ग्रामपंचायतीतील 11 प्रभागातील 12 पदासाठी, देवळी 5 ग्रामपंचायतीतील 6 प्रभागातील 6 पदांसाठी, आर्वी 8 ग्रामपंचायतीतील 12 प्रभागातील 13 पदासाठी, आष्टी 1 ग्रामपंचायतीतील 1 प्रभागातील 1 पदासाठी, कारंजा 5 ग्रामपंचायतीतील 7 प्रभागातील 7 पदासाठी, हिंगणघाट 2 ग्रामपंचायतीतील 3 प्रभागातील 3 पदासाठी, समुदपूर 7 ग्रामपंचायतीतील 9 प्रभागातील 9 पदासाठी अशा एकुण 40 ग्रामपंचायतीतील 53 प्रभागातील 55 रिक्त पदासाठी पोट निवडणूक होणार आहे.
निवडणूक होणा-या संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आचार संहिता लागू करण्यात आली असून आचार संहितेचे तंतोतंत पालन करावे, असे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी निवडणूक अधिकारी, ग्रामपंचायत निवडणूक यांनी कळविले आहे.






