महाराष्ट्र दिनांक 17 एप्रिल ( प्रतिनिधी)
राज्यात भारनियमनावरून वातावरण तापले असतानाच, ‘राज्य लवकरच भारनियमनमुक्त होईल,’ अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.
‘गुजरातमधून आपण ७६० मेगावॉट वीज खरेदी केली आहे; तसेच साठा न करता उपलब्ध कोळसा पूर्ण वापरण्याचे निर्देश आपण दिले आहेत. तरीही काही प्रमाणात भारनियमन करावे लागत आहे. यावर आम्ही १९ एप्रिलपर्यंत मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळे येत्या मंगळवारपर्यंत राज्य भारनियमनमुक्त होईल,’ असा विश्वास ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्यात सन २०२५पर्यंत अतिरिक्त वीज असेल, असा दावा केला जात आहे. परंतु, राज्य वीज नियामक आयोगाच्या अहवालात ही माहिती नसल्याचे ते म्हणाले. करोनानंतर पूर्वपदावर आलेले जनजीवन, उष्णतेची लाट आणि पूर्ण क्षमतेने सुरू झालेले उद्योग यामुळे राज्याची मागणी २७०० मेगावॉट झाली असून, राज्याची कमाल मागणी आणि वीज उत्पादन यांच्यात अडीच ते तीन हजार मेगावॉटची तफावत आहे, असे त्यांनी सांगितले.






