जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत

0
12

यवतमाळ, दि. 18 : राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. तसेच सदर कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा ही सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अत्यावश्यक सेवेतील काही बाबी वगळता इतर अत्यावश्यक दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता या दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहील.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली आस्थापना / दुकाने (सर्व प्रकारची रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधी दुकाने व औषधी कंपन्या, औषधी व आरोग्य सेवा व औषध निर्मिती करणारे कारखाने तसेच त्यांचे वितरण, वाहतूक व्यवस्था, लस, मास्क, सॅनिटायझर, वैद्यकीय उपकरणे व तत्सम बाबी, कच्चा माल युनीट आणि त्या संबंधित सेवा इत्यादी, पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांची औषधीची दुकाने, पेट्रोलपंप व पेट्रोलियम संबंधित उत्पादने, विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा, एटीएम, टपालसेवा केंद्र वगळता) ही संचारबंदीच्या कालावधीत दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत यापुढे सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

तसेच सर्व प्रकारची खानावळ, हॉटेल व उपहारगृहामधून पुरविण्यात येणारी पार्सल सेवा, दुध संकलन केंद्र, दुधाचे घरपोच वितरण सेवा या बाबी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. शासकीय कार्यालये, परवानगी असलेले खाजगी कार्यालये, बँका या त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार सुरू राहतील.

सदर आदेश 19 एप्रिल 2021 च्या सकाळी 7 वाजतापासून 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here