वर्धा जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांच्या वेळात बदल
रस्त्यावरील गर्दी कमी होण्यासाठी किराणा, भाजी, फळे, मांस, अंडी मासे अशी अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरू राहतील.वैद्यकीय सेवा, मेडिकल सेवा नियमित सुरू राहतील तसेच खानावळ, हॉटेल, रेस्टॉरंट येथून पार्सल सेवा, दूध संकलन केंद्र, दूध घरपोच वितरण सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार। याबाबत कडक अंमलबजावणी करावी असे निर्देश जिलाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिलेत.
संचारबंदीची अंमलबजावणी कडक करावी
-जिल्हाधिकारी
नियमांचे पालन न करणाऱ्या दुकाने आणि नागरिकांना दंड करावा
राज्यशासनाने ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत दिलेल्या नियमानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यासाठी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. मात्र तरीही नागरिक विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या दुकानांची वेळ कमी करत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आज जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिलेत.
जिल्हाधिकारी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील अधिकारयांशी संवाद साधला, यात पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले सहभागी झाले होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी कोविड परिस्थिती आणि संचारबंदीचा आढावा घेताना कंटेंटमेंट झोनमध्ये कडक अंमलबजावणी करण्यासोबतच बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी करण्याच्या सूचना दिल्यात. दुकानांमध्ये कोविड नियमांचे पालन होत नसल्यास दुकाने सील करून दंड आकारण्याचे आदेश त्यांनी दिलेत.
खाजगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवाव्यात
वर्धा जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या बघता खाटांची उणीव भासत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील खाजगी रुग्णालयांना त्यांच्या रुग्णालयातील काही खाटा कोविड रुग्णासाठी राखीव ठेवण्यासंदर्भात त्यांना सूचित करावे असेही जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सांगितले. आर्वी आणि हिंगणघाट मध्ये शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यात यावी, तिथे खाजगी डॉक्टरांच्या सेवा घेण्यात याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
माजी सैनिक, सैनिक व नातेवाईकांसाठी पुलगाव येथील रुग्णालायत व्यवस्था
जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पुलगाव येथील शस्त्र भांडारमध्ये कोविड रुग्णालय सुरू केले आहे. त्यामुळे सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोविड रुग्णाला भरती करण्यासाठी पुलगाव येथील रुग्णालयाचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
होम आयसोलेशनसाठी खाजगी नोंदणीकृत डॉक्टरांची दूरध्वनीद्वारे सेवा
होम आयसोलेशन मध्ये असलेले रुग्ण खाजगी डॉक्टरांकडून औषधे व आवश्यक सल्ला घेतात.पण गरिबांना अशा डॉक्टरांची ओळख किंवा संपर्क नसल्यामुळे त्यांची अडचण लक्षात घेऊन वर्धा नगर परिषदेने अशा वरिष्ठ खाजगी डॉक्टरांची यादी तयार करून त्यांच्या वेळा निश्चित कराव्यात आणि त्याला प्रसिद्धी द्यावी. रुग्णांनी वर्धा नगर परिषदेच्या 18002706700 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.
लसीकरणाचा वेग वाढवावा:– वर्धा जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी चांगली असल्यामुळे वर्धा जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आता जास्त लसी मिळाल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने लसीकरणाचा वेग आणखी वाढवावा, त्याप्रमाणात जिल्ह्याला लसीचा पुरवठा होत राहील. याचा लाभ रुग्ण संख्या कमी करण्यासाठी होईल.
केंद्रीय चमूची शाबासकीची थाप
जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या आणि जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने पाठविलेल्या चमूने जिल्ह्यातील कोविड सुविधांसाठी जिल्हा प्रशासनाला शाबासकी दिली आहे. उपलब्ध साधन सामग्रीचा योग्य वापर करून जिल्ह्यात कोविड परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळत असल्याचा अभिप्राय दिला आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे कौतुक केले.






