यवतमाळ दि. 15 मार्च (प्रतिनिधी) :
यवतमाळ जिल्ह्यात मार्च-2020 नंतर आज प्रथमच कोरोनाची सक्रीय रूग्णसंख्या शुन्यावर आली आहे. गत काही दिवसांपासून कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या मंदावली होती त्यात मागील 5 दिवसांपासून केलेल्या तपासणीत एकही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
तर जिल्ह्यात सक्रीय असलेला एक रूग्ण देखील आज बरा होऊन घरी गेल्याने जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या तीन लाटेनंतर प्रथमच एकही सक्रीय कोरोना रूग्ण नसल्याने यवतमाळ जिल्हा तुर्तास कोरोनामुक्त झाल्याचा दिलासा मिळाला आहे.
मात्र कोरोनाचा धोका अद्यापही कायम असून जिल्ह्यातील कोरोना तपासणीसाठी मिळणारा अल्प प्रतिसाद, आजुबाजूच्या जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या व तेथून प्रवाशांचे होणारे आवागमन, ही स्थिती पाहता जिल्ह्यात पुन्हा कोरोना रूग्ण वाढू नये यासाठी कोरोना त्रिसुत्री नियमांचे पालन करणे अजूनही आवश्यक आहे.
दोन वर्षापुर्वी यवतमाळच्या तीन कुटूंबातील 10 सदस्य दुबई टूर वरून 1 मार्च 2020 रोजी भारतात परतल्यावर त्यातील एक सदस्य पुणे येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे यवतमाळ येथील उर्वरित नऊ सदस्यांना 10 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल नागपूर येथून 14 मार्च रोजी प्राप्त झाला असता त्यातील दोघेजण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. नंतर जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा हा आलेख कमी जास्त प्रमाणात वाढतच गेला.
जिल्ह्यात आजपर्यंत 79 हजार 65 कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले तर 77 हजार 262 जण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील 1803 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. जिल्ह्यात सर्वाधिक 1399 कोरोना बाधीत रूग्णांची नोंद दिनांक 3 मे 2021 रोजी, तर सर्वाधिक 46 मृत्यू दिनांक 26 एप्रिल 2021 रोजी झाले होते.
सुरवातीला कोरोना तपासणीसाठी नागपूर येथे नमुने पाठवल्या जात होते. नंतर जिल्ह्यात 2 जून 2020 पासून व्ही.आर.डी.एल. मशीन कार्यान्वित झाल्याने कोरोना तपासण्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातच होऊ लागल्या. यात पुढे आर.टी.पी.सी.आर. मशीनची टप्प्याटप्प्याने क्षमता वाढ करून तपासणी संख्या वाढविण्यात आली. जिल्या99त आतापर्यंत तब्बल आठ लाख 48 हजार 920 कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 7 लाख 69 हजार 855 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.
नवीन आलेला आजार, अल्पावधीतच वेगाने पसरणारा, त्यात मृत्यूचा धोका. जिल्हा कोरोना पॉझिटीव्ह ते कोरोना निगेटिव्ह होण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. अचानक आलेल्या या आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन वेळीच समोर सरसावल्याने नागरिकांचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास दृढ झाला.
कोरोना कालावधीत जिल्ह्यातील एकूण सर्वच लोकप्रतिनीधी तसेच जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस विभाग व इतर सर्व शासकीय यंत्रणा व काही सेवाभावी संस्था यांनी रात्रंदिवस एकजुटीने काम केले. जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पीटल उभारण्यात येवून मोफत उपचार सेवा देण्यात आली.
खाजगी रूग्णालये अधिग्रहीत करण्यात आली. खाजगी संस्थात रूग्णांची लूट होऊ नये म्हणून शासनामार्फत तपसणीचे दर देखील निश्चिती करून देण्यात आले. दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यात ऑक्सीजन साठा अद्यावत करण्यात आला. प्रत्येक ग्रामीण आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स मिळून एकूणच आरोग्य सेवेचे अद्यावतीकरण करण्यात आले.
शासनातर्फे कोरोना कालावधीत गरजूना मोफत अन्यधान्य व शिवभोजन केंद्राद्वारे मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक संस्था व नागरिकांमार्फत सेवाभावातून एकमेकांना मदत करण्यात आली. त्यातून नागरी एकात्मता व एकमेंकांबद्दल आत्मीयता वाढली. आता जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने एन्ट्री घेवू नये हीच सर्वाची अपेक्षा आहे.
*नागरिकांनी केलेले नियमांचे पालन व लसिकरणाला दिलेला प्रतिसाद यामुळे कोविड वर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. सध्या कोविड चाचण्यांची संख्याही कमी आहे. आपले दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी कोविड त्रिसुत्रीचे पालन करावे व कोविडपासून संरक्षणासाठी नागरिकांनी लसिकरण दोन्ही डोज पुर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.*






