प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत वर्धेतील चार प्रकल्पांना मंजूरी

0
9

वर्धा, दि.22 फेब्रुवारी (प्रतिनिधी) 

13 हजार हेक्टरवर जलसंधारणाची कामे

 प्रकल्पांमध्ये 43 गावांचा समावेश 

 जिल्हाधिका-यांकडून पाणलोटचा आढावा

        

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत जिल्हयात चार प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमधील एकुण 43 गावांमध्ये तब्बल 13 हजार हेक्टरवर जलसंधारणाची कामे होणार आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज जिल्हा पाणलोट विकास समितीचा आढावा घेतला.

बैठकीला जिल्हाधिका-यांसह जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत, सेलूचे तालुका कृषि अधिकारी अश्विनी कुंभार, समुद्रपूरचे सचिन सुतार, तंत्र अधिकारी शरद गावडे आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहे. या कामांसोबतच प्रकल्पामध्ये समाविष्ठ असलेल्या गावातील भूमिहीन नागरिक, बचतगट, वैयक्तिक शेतक-यांना विविध प्रकरच्या व्यवसायासाठी फिरता निधी सुध्दा दिल्या जातो. निवड झालेल्या गावांमध्ये योजने अंतर्गत ढाळीचे बांध, सिमेंटनाला बांध, खोल सलग समतल चर आदी जलसंधारणाची कामे केली जातात.

मंजूर झालेल्या चार प्रकल्पांमध्ये सेलू तालक्यांमधील तीन प्रकल्पांचा समावेश असून पहिल्या प्रकल्पामध्ये हिवरा, पिंपळगाव, सुकळी स्टेशन, आर्वी लहान, धानोली (मेघे), कोपरा, बेलगाव (क), शहापूर, खडका, खडकी या अकरा गावांचा समावेश असून 5 कोटी 67 लक्ष रुपयांची प्रकल्प किंमत असून 2 हजार 577 हेक्टरवर या प्रकल्पामध्ये कामे केली जातील.

सेलू मधील दुस-या प्रकल्पात देऊळगाव, चानकी, चारमंडळ, मडका, चिचघाट, कोटंबा, गंगापूर, जंगलापूर, कोल्ही, लोंढापूर, कोलगाव, इंदापूर या बारा गावांचा समावेश आहे. प्रकल्पाची किंमत 8 कोटी 14 लाख रुपये असून 3 हजार 701 हेक्टरवर कामे केली जातील. याच तालुक्यात तिस-या प्रकल्पात पळसगाव, पिपरा, हेलोडी, सेलडोह, डोरली, हिवरा, परसोडी, दिग्रस या आठ गावांचा समावेश असून प्रकल्प किंमत 5 कोटी 85 लाख रुपये असून 2 हजार 657 हेक्टरवर कामे केली जातील.

समुद्रपूर तालुक्यातील एक प्रकल्प मंजूर झाला असून तेथे उमरी, आकोला, पातालकोट, उसेगाव, मंगरुळ, चापापूर, सातघरी, धामणगाव, बोरी, गिरगाव, ताडगाव व बंदार या बारा गावांमध्ये 6 कोटी 67 लाख रुपये खचून 3 हजार 35 हेक्टरवर उपचाराची कामे होतील.

मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवडीची कामे समाविष्ठ करण्यात यावी. त्याचप्रमाणे एमआर सॅकच्या नकाशानुसारच कामे करण्यात यावी. कामे करत असतांना पाणलोटातील भूमिहीन, वैयक्तिक शेतकरी व बचतगटातील महिलांना रोजगार कसा उपलब्घ होतील यासाठी प्राधान्याने कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बैठकीत दिले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here