रिद्धपूरला श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा अध्ययन केंद्र – प्रो. रजनीश शुक्ल यांची माहिती

0
9

नागपूर प्रतिनिधी दि 7 सप्टेंबर

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा आणि तत्त्वज्ञान अध्ययन केंद्र सुरू करण्यात येणार असून, याबाबत अधिकृत परवानगी भारत सरकारतर्फे प्राप्त झाल्याची माहिती या विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. रजनीश शुक्ल यांनी मंगळवारी दिली.

याप्रसंगी बोलताना प्रो. रजनीश शुक्ल म्हणाले, भारतातील श्रेष्ठतम संतांपैकी एक श्री चक्रधर स्वामी आहेत. यंदाचे वर्ष हे त्यांचे अष्ट जन्मशताब्दी वर्ष आहे. मुळात गुजरात येथे जन्मलेल्या श्री चक्रधर स्वामींची रिद्धपूर ही कर्मभूमी होती. तेथे राहूनच त्यांनी मराठी भाषेत भारतीय तत्वज्ञान, श्रीम्द भगवत गीता, सनातन धर्म, चिकित्सा यासह अनेक विषयांवर विपुल ग्रंथांची रचना केली. त्या विपुल ज्ञानसंपदेचे सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणे तथा त्यावर अध्ययन व अनुशीलन यांची व्यवस्था करण्याचे काम प्रस्तावित केंद्र करणार आहे.

अष्ट जन्मशताब्दीनिमित्त श्री चक्रधर स्वामी यांच्या नावाने शिक्षण क्षेत्रात मराठी विद्यापीठ व्हावे, अशी महानुभाव पंथीयांची इच्छा होती. त्यादृष्टीने प्रयत्न करीत केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि पंतप्रधानांनी या प्रस्तावाला मान्यता दिली असून, यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. त्यानुसारच मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्र येथे सुुरू करण्याचे निश्चित झाले आहे. ८ सप्टेंबरला रिद्धपूर, अमरावती येथे या केंद्रासाठी लागणाèया जागेची पाहणी करून त्या ठिकाणी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

प्रस्तावित मराठी भाषा अध्ययन केंद्रात मराठी भाषांसह तुलनात्मक अध्ययन, मराठी भाषेचे तंत्र, ज्ञानात्मक विकास, मराठी साहित्य व इतर भारतीय भाषेच्या साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबतच संशोधन केंद्र म्हणून येथे विद्याथ्र्यांना अभ्यास करता येणार असून, यंदाच्या शैक्षणिक सत्रापासूनच हे केंद्र सुरू करण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे.

कॅम्पस प्रकारातील हे केंद्र असून, येथे विद्याथ्र्यांसाठी रोजगारोपयोगी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे. हे केंद्र अधिक बळकट आणि सक्षम करण्यासाठी भारतीय दर्शनिक अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, भारतीय भाषा संस्थान, म्हैसूर आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास, नवी दिल्ली यांचा हातभार लागणार असल्याचे प्रो. शुक्ल यांनी सांगितले. पत्रपरिषदेत अविनाश ठाकरे, महानुभाव पंथाचे कारंजेकर बाबा, डोळसकर बाबा, दिनेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here