डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्राने शिवसेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या

0
7

अमरावती : शिवसेनेच्या तिवसा शहर प्रमुखाच्या हत्येने अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. 34 वर्षीय अमोल पाटील याची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या करण्यात आली. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील आशीर्वाद वाईन बारसमोर शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अमोल पाटील याच्यावर यापूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता. त्याला दीड महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपार होण्याचा आदेशही काढला होता.

अवैध उद्योगातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी दोन ते तीन जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झाली होती, मात्र अद्यापही आरोपींचा शोध लागला नाही. राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here