ऑनलाईन मोफत सातबारा शेतकऱ्यांपर्यत पोहोचने आवश्यक – जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार

0
24

वर्धा दिनांक 5 मे (प्रतिनिधी) :

शेतकऱ्यांना सातबारा मोफत आणि कमी वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने सातबारा संगणकीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. वर्धा जिल्हा सातबारा संगणकीकरणात आघाडीवर आहे. केवळ सातबाऱ्यांचे संगणकीकरण होऊन आवश्यक नाही तर ऑनलाईन सातबारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.

सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या सभागृहात ई-फेरफार आज्ञावली प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रविंद्र जोगी, हरीष धार्मिक, शिल्पा सोनाले सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.

ऑनलाईन सातबारा वाटपात जिल्हा आघाडीवर आहे. यात सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. ई-पिक पाहणीमध्ये सुध्दा आपण चांगले काम केले आहे. ऑनलाईन कामकाज करतांना अनावधानाने अनेक चुका होत असतात. बरेचदा पुरेसी माहिती नसल्याने चुका होण्याची शक्यता आहे. कामकाज अधिक गतीमान आणि बिनचुक व्हावे, यासाठी या प्रशिक्षणाचा चांगला उपयोग होणार आहे.

फेरफार फार महत्वाची बाब आहे. वारसाच्या नोंदी, वारस हक्क सोडणे, नोंदी वेळीच घेणे आवश्यक असते. ही प्रक्रीया गतीमान आणि वेळेत व्हायला पाहिजे. अनेक ठिकाणी अतिक्रमण असते. जुने अतिक्रमणाची कार्यवाही अटी शर्तींच्या अधीन राहून केली पाहिजे, असे पुढे बोलतांना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले. यावेळी हरीष धार्मिक यांचे देखील मार्गदर्शन झाले.

सदर प्रशिक्षणाला नागपुर येथील तलाठी अजय खोब्रागडे, वर्धा येथील तलाठी यशवंत लडके यांनी ई-फेरफार व इतर बाबींचे प्रशिक्षण दिले. सुरुवातीस प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी केले. सुत्रसंचालन राखी जयस्वाल यांनी केले तर आभार अधिक्षक विजय लोखंडे यांनी मानले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here