भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी पाणी वापराचे नियोजन आवश्यक – जिल्हाधिकारी अमोल येडगे

0
13

यवतमाळ दि. 16 मार्च (प्रतिनिधी)

जलजागृती सप्ताहाला जलपूजनाने प्रारंभ

 

यवतमाळ जिल्ह्यात नैसर्गिक पावसाचे प्रमाण चांगले असले तरी भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी प्रशासकीय विभागासह समाजसेवी संस्थांनी आतापासूनच पाणी वापराचे योग्य नियोजन करावे. यासाठी पाणी वापर संस्था कार्यान्वित करून त्यांचेमार्फत सिंचन व्यवस्थापन सुरु करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.

जागतिक जलदिनानिमित्य जलसंपदा विभागामार्फत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे आज करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील जीवनदायीनी नद्या अरुणावती, अडाण, पैनगंगा, बेंबळा व निर्गुडा या नद्यांच्या पाण्याचे पुजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, यवतमाळ सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता मनिष राजभोज, कार्यकारी अभियंता घनशाम टोटे, कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, सावित्री जोतीराव फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश शिर्के, जलदूत श्री. मिश्रा व अमिल कंठवार प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून अधीक्षक अभियंता मनिष राजभोज यांनी जलजागृती सप्ताहाच्या कार्यक्रमाची रुपरेषा सविस्तरपणे सांगितली. 16 ते 23 मार्च दरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यामिक, उच्च माध्यमिक शाळा, विद्यालयातील विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा देणे, शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा हे कार्यक्रम घेऊन समाजामध्ये जलजागृती निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाचे विविध प्रकल्पाचे लाभक्षेत्रामध्ये पाणीवापर संस्थेचे पदाधिकारी, लाभधारक, शेतकरी यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व १६ तालुक्यांमध्ये प्रकल्पांचे लाभक्षेत्रात/तालुक्याचे ठिकाणी सिंचन व बिगर सिंचनाच्या पाण्याचे महत्व, साठवण, वितरण, त्याचा काटकसरीने वापर, पाणी नाश टाळणे, सिंचन पध्दती, पिकांसाठी आवश्यक पाणी, त्याचे प्रमाणे इ. बाबत कार्यशाळा घेण्यात येत असल्याचे राजभोज यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, डॉ. प्रमोद यादगीरवार, जलदूत अमिलकंठवार यांनीदेखील यांनी पाण्याचे महत्त्व समजावून पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली.

कार्यक्रमाचे संचालन अभियंता अशोक ढवळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार यवतमाळ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती जाधव यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, अधिकारी व कर्मचारी, पाणी वापर संस्थेचे प्रतिनिधी, जलदूत व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here