वर्धा, दि.4 मार्च (प्रतिनिधी) :
जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन आदेश जारी
पुर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक
कार्यक्रमांना मात्र उपस्थितीचे बंधन कायम
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शासनाने लसीकरण, पॅाझिटिव्हीटी दर व रुग्णालयात दाखल रुग्ण संख्येच्या आधारे जिल्ह्यांचे वर्गीकरण केले असून त्यानुसार वर्धा जिल्हा अ गटात समाविष्ठ करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांवरील उपस्थिती वगळता बहुतांश निर्बंध शिथील करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय उद्याने, सरकारी बाग बगीचे, प्रेक्षणिय व पर्यटन स्थळे, अम्युझमेंट पार्क, थीम पार्क, जलतरण तलाव, जल उद्याने, किल्ले व इतर मनोरंजन स्थळे, ब्युटी पार्लर, सलुन, हेअर कटींग, स्पा, वेलनेस सेंटर, जीम, रेस्टॅारंट, हॅाटेल, उपहारगृहे, सिनेमागृहे, नाट्यगृह इत्यादी नियमीत वेळेनुसार पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी राहिल.
यासोबतच शासकीय, अशासकीय, निमशासकीय, औद्योगिक व वैद्यानिक संस्था, प्रशिक्षण संस्था व इतर सर्व प्रशिक्षण संस्था नियमित वेळेनुसार पुर्ण क्षमतेने सुरु राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक शिकवणी वर्ग, अंगणवाडी इत्यादी नियमित वेळेनुसार पुर्ण क्षमतेने ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने सुरु राहतील. आंतरराज्य व आंतर जिल्हा प्रवासासाठी मात्र संबंधितांचे पुर्ण लसीकरण किंवा 72 तास आधीचे आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रिडाकलप, शैक्षणिक व इतर उत्सव, कार्यक्रम, लग्न समारंभ, अंत्यविधीसाठी क्षमतेच्या 50 टक्के किंवा 1 हजार यापेक्षा जी संख्या कमी असेल तेवढ्या लोकांना उपस्थित राहता येतील. ही संख्या 1 हजार पेक्षा अधिक असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वर्धा यांना माहिती देणे अनिवार्य आहे.
सर्वसामान्य जनतेला सुविधा देणाऱ्या आस्थापना, घरपोच सेवा देणारा कर्मचारी वर्ग, सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेणारे नागरीक, मॅाल, सिनेमागृहे, नाट्यगृह, प्रेक्षणिय स्थळे, रेस्टॅारेंट, क्रिडाकलप, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचारी, अभ्यागत, नागरीक यांचे पुर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
यासोबतच शासकीय, अशासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचारी, भेट देणारे अभ्यागत, नागरीक, औद्योगिक व वैद्यानिक संस्था, प्रशिक्षण संस्थांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे देखिल संपुर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आदेशात नमुद केले आहे. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे.






