वर्धा, दि. 28 (प्रतिनिधि) :महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने वर्धिनी दिवाळी महोत्सवाचे आयोजन येथील हॉकर्स प्लाझा येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात ग्रामीण महिलांनी निर्मिती केलेल्या फराळाच्या वस्तू उपलब्ध आहे. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा वैशाली येरावार, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्रकल्प संचालक विश्वास सिद, नगराध्यक्ष अतुल तराळे तसेच जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती गाखरे यांनी वर्धिनी महोत्सवामुळे ग्रामीण महिलांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे सांगितले. जिल्हयात बचत गटाच्या महिला मोठया प्रमाणात प्रगती साधत आहे. विविध वस्तूंची निर्मिती सुध्दा महिला करीत आहे. त्यांना बाजार पेठ उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगानेच महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
सदर महोत्सव दि.1 नोव्हेंबर पर्यंत हॉकर्स प्लाझा येथे राहणार आहे. महोत्सवात ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या चिवडा, लाडू, चकल्या, बर्फी, अनरसे, सेव या फराळाच्या वस्तूंसह महिलांनी तयार केल्या पणत्या, रांगोळी, आकाश दिवा, मेनबत्तया, लाईट आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे. या महोत्सवाला भेट देऊन गरीब, गरजू ग्रामीण महिलांव्दारे तयार करण्यात आलेल्या वस्तू विकत घ्याव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे, जिल्हा व्यवस्थापक मनिष कावडे, सौरभ निनावे, रवी लाटेलवार, तालुका अभियान व्यवस्थापक विलास झोटींग, ओमलता दरणे आदी उपस्थित होते.






