नागरिकांनी नवरात्रौत्सव साधेपनाने साजरा करावा
-जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार
अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी डायल 112 उपक्रम कार्यान्वित
वर्धा, दि. 5 : जिल्ह्यात 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव, दुर्गापुजा व दसरा सण नागरिकांव्दारे साजरा करण्यात येणार आहे. पंरतू, अजूनही कोरोनाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी न करता कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करुन नवरात्रौत्सव अगदी साधेपनाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्याच्या जनतेला केले आहे. नवरात्रौत्सव साजरा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचे प्रत्येकाने पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे –
कोविड -19 अंतर्गत संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक नवरात्रौत्सावासाठी मंडळांनी नगरपालिका प्रशासनाची यशोचित पूर्वपरवानगी घ्यावी. नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती देवीची उंची दोन फुट तर सार्वजनिक मंडळाच्या मुर्तीची उंची चार फुटाचा मर्यादेत असावी. तसेच त्याअनुषंगाने साध्या पध्दतीचे सजावट असावे. मागीलवर्षी प्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमवर मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असावी तसेच मुर्तीचे घरच्या घरी विसर्जन करावे. सार्वजनिक मंडळाने देवीच्या मुर्तीचे विसर्जनासाठी कुत्रिम कुंड निर्माण करावे. प्रशासनाकडून ज्याठिकाणी कुत्रिम कुंड निर्माण करण्यात आले आहेत, त्याच ठिकाणी देवीचे विसर्जन करावे. मंडळाच्या ठिकाणी गर्दी आकर्षित होणार नाही असे देखावे तयार करता येणार नाही. तसेच आरोग्य विषयक किंवा सामाजिक संदेश, माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेबाबत जनजागृतीचे संदेश प्रदर्शित करण्यास मुभा दिली आहे.
यावर्षी गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे किंवा रक्तदान शिबिरे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन आयोजित करण्यास परवानगी आहे. तसेच कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजारासंबंधी व स्वच्छता संदेशांची जनजागृती करण्यात यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करुन देण्यात यावी. आरती, भजन, किर्तन वा धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषण होणार नाही याची संबंधित मंडळाने दक्षता घ्यावी व नियमांचे काटेकोर पालन करावे. मंडपात एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती, कार्यकर्ते उपस्थित नसावे. मंडपामध्ये खाद्यपदार्थ किंवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. देवीचे आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात मनाई करण्यात आली आहे. लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्या ठिकाणी विसर्जन स्थळी त्यांना नेवू नये.
देवीच्या विसर्जनासाठी स्थानिक नगरपालिका, विविध मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने कुत्रिम तलाव किंवा कुंड निर्माण करण्यात येईल, नागरिकांनी त्याच ठिकाणी किंवा आपल्या घरीच टब तयार करुन देवीचे विसर्जन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, वर्धा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप आदी यावेळी उपस्थित होते.






