आझादी दी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छ भारत मोहिम
वर्धा, दि. 30 : संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून या निमित्त 2 ते 30 ऑक्टोबर या कालावधित स्वच्छ भारत उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नगर पालिका व ग्राम पंचायतींनी कर्मचारी व स्वयंसेवका मार्फत 2 ते 9 ऑक्टोंबर दरम्यान मोहिम राबवून त्यांच्या क्षेत्रातील प्लॅस्टीक कचरा गोळा करुन ठेवावा. सदर गोळा करण्यात आलेले प्लॅस्टीक नेहरु युवा केंद्राच्या स्वयंसेवकामार्फत एकत्रित करुन विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यासाठी सर्व नगर पालिका व ग्राम पंचयातींनी सहकार्य करावे अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज स्वच्छ भारत मोहिम कार्यक्रमाच्या नियोजन आढावा बैठकित केल्यात.
बैठकिला उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोज खैरनार, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक शिवधन शर्मा वर्धा नगर पालिकेचे मुख्याधिकारी विजय देवळीकर, नगर पालिका प्रशासनचे मनोजकुमार शहा, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव उपस्थित होते.
जिल्हयातील सर्वात जास्त प्लॅस्टीक कचरा गोळा करणा-या ग्राम पंचायती व नगर पालिका यांना केंद्र शासनाच्या युवा खेळ मंत्रालयाचे वतीने प्रमाणपत्र देण्यात येईल. नागरिकांनी ओल्या कच-याची विल्हेवाट घरीच लावण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा प्रशिक्षण दया त्यानंतर ओला कचरा बाहेर टाकणा-यांवर नगर पालिकेने कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.






