बोलणे बंद केले म्हणून प्रेयसीला मारहाण करून फासावर लटकविले पण…

0
14

नागपुर दिनांक 12 दिसंबर (शहर प्रतिनिधि)

बोलणे बंद केल्याने प्रियकराने मारहाण करून गळफास लावत प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना कोराडी भागात शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आद्या ऊर्फ आदेश दुर्गादास तिरपुडे (वय २३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेशविरुद्ध वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही २१वर्षीय तरुणी परिचारिका आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिचे आदेशसोबत प्रेमसंबंध आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात आदेशला अटक केली होती. याबाबत तरुणीला कळाले. त्यामुळे तिने त्याच्यासोबत बोलणे बंद केले.

रात्री तो प्रेयसीच्या घरात घुसला. मारहाण करून तिचा विनयभंग केला. तसेच तिचा दुपट्टा लोखंडी पाइपला बांधला, तिला गळफास लावला. तरुणीने आरडाओरड केली. बाजूलाच राहणारा तिचा चुलतभाऊ आला. दार बंद होते. त्याने आवाज दिला. आदेशने दार उघडले. ‘तू येथे काय करतोय’, अशी विचारणा चुलतभावाने आदेशला केली. ‘तुला काय करायचे आहे’, अस म्हणत धक्का मारून आदेश तेथून पसार झाला. चुलतभाऊ घरात गेला असता त्याला बहीण लटकलेली दिसली. त्याने गळफास काढला व पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

माहिती मिळताच कोराडी पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पद्माकर धुर्वे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते. कोराडी पोलिसांनी आदेशविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here